नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना ओबीसी जनगणना, लोकशाहीची स्थिती आणि नीट परीक्षा वाद या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी जनगणना प्रक्रियेत स्वतंत्र कॉलम असणे आवश्यक असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन उभारण्याबाबत बैठकीत चर्चा होणार असून लवकरच पुढील भूमिका जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, “देशात लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी पक्षांना संपविण्याचे राजकारण केले जात असून लोकशाही संस्थांवर दबाव निर्माण केला जात आहे.”
नीट परीक्षा व पेपरफुटी प्रकरणावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात सापडले असून केंद्र सरकार याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते,” अशी टीका त्यांनी केली.





