Published On : Wed, Oct 2nd, 2019

पोस्टल बॅलेटव्दारे मतदान प्रक्रिया सुरु – रविंद्र ठाकरे

Advertisement

नागपूर: विधानसभा निवडणूकीसाठी पोस्टल बॅलेटव्दारे मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. भारतीय सेना दलातील कार्यरत अधिकारी व जवान यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल बॅलेट मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये नियुक्त झालेले अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी असणारी पोस्टल बॅलेट सुविधा प्रभावीपणे राबवा, अशी सूचना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात पोस्टल बॅलेट सिस्टीम ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तांत्रिक सहायकांना ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) बाबत प्रात्यक्षिकाव्दारे माहिती देवून जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, जिल्हा समन्वयक नोडल अधिकारी (आयसीटी) उमेश घुग्गुसकर, जिल्हा माहिती अधिकारी तथा नोडल अधिकारी अनिल गडेकर, सूचना तंत्रज्ञान अधिकारी हरीश अय्यर, श्रीमती क्षमा बोरुले आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे म्हणाले, विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक विषयक कामकाजात असणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासाठी इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेट (ईडीसी) किंवा पोस्टल बॅलेट (पीबी) या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांची निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्ती झाली आहे परंतू त्यांचे नाव बाहेरील जिल्ह्यातील मतदार यादीत आहे, त्यांनी पोस्टल बॅलेटने मतदान करण्यासाठीचा अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावा. सैन्यातील सर्व्हिस व्होटर्ससाठी ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) ही प्रणाली यावेळी नव्याने उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याव्दारे भारतीय सेना दलातील कार्यरत अधिकारी व जवानांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे सुलभ होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना आवश्यक असल्यास पोस्टल बॅलेट प्रणाली तात्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी दक्ष राहण्याचे आवाहन केले. जिल्हा समन्वयक नोडल अधिकारी (आयसीटी) उमेश घुग्गुसकर यांनी यावेळी तांत्रिक सहायकांना ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) बाबत प्रात्यक्षिकाव्दारे माहिती देऊन त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण केले.