
मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उत्सुकता वाढली असताना, राज्य निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुका टप्प्याटप्याने घेतल्या जाणार असून डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत मतदानाची शक्यता आहे. नाशिकमध्ये आयोजित आढावा बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
निवडणुकीसाठी तयारी सुरू-
निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक प्रशासनिक व तांत्रिक तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीची पुढील कार्यवाही होणार आहे. यासाठी 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीचा आधार घेण्यात येणार आहे.
VV-PAT यंत्रांचा वापर नकारात्मक-
यावेळी होणाऱ्या निवडणुकांमध्ये VV-PAT यंत्रांचा वापर केला जाणार नाही, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीनेच मतदान होईल.
आरक्षण पद्धतीत बदल नाही-
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील SC-ST आरक्षण निश्चित असते, तर OBC आरक्षणासाठी लॉटरी पद्धत वापरण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हीच पद्धत लागू करण्यात येणार असून, मागील निवडणुकांप्रमाणेच नियम पाळले जातील.
चार सदस्यीय प्रभाग रचना लागू-
महानगरपालिका निवडणुकांसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली आहे.
- ‘अ’ वर्गात: पुणे, नागपूर
- ‘ब’ वर्गात: ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
- ‘क’ वर्गात: नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर
या महापालिकांमध्ये ही नवी रचना लागू केली जाणार आहे.