Published On : Sun, Dec 15th, 2019

व्हीएनआयटीचे असोसिएट प्रोफेसर डॉ. श्रीराम सोनवणे यांना प्रतिष्ठित अश्या महाराष्ट्र विज्ञान अकादमीतर्फे फेलो पुरस्कार प्रदान

Advertisement

नागपूर: नामांकित अश्या महाराष्ट्र विज्ञान अकादमीतर्फे प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या व्हीएनआयटीचे असोसिएट प्रोफेसर डॉ. श्रीराम सोनवणे यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी फेलो हा पुरस्कार राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान व बायोटेक्नॉलॉजी संस्था, पुणे येथे प्रदान करण्यात आला आहे. डॉ. श्रीराम सोनवणे हे अभियांत्रिकी संशोधन आणि विकास, अध्यापन व पर्यवेक्षण, नियोजन व प्रशासन, आंतरराष्ट्रीय सहकार्य इत्यादी विविध बाबींचा समृद्ध अनुभव असलेले भारतातील व जगातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत.

डॉ.सोनवणे यांना प्रख्यात वैज्ञानिक म्हणून ओळखले जाते, चांगले संशोधन आणि गुणात्मक व परिमाणात्मक शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या दृष्टीने कोणत्याही संस्थेला नवीन उंचीवर नेऊन ठेवणारे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. डॉ. श्रीराम सोनवणे हे सध्या व्हीएनआयटी, नागपुर या संस्थेत असोसिएट प्रोफेसर आहेत. ते यापूर्वीच भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST)प्रायोजित अनेक संशोधन प्रकल्पांवर काम करत आहेत. डॉ. सोनवणे हे भारत-ट्युनिशिया, भारत-ऑस्ट्रेलिया, भारत-मलेशिया आणि भारत-रशिया अशा अनेक प्रकल्पांवर काम करत आहेत. त्यांच्या संशोधनातून समाजाच्या उन्नतीवर भर देण्यात आलेला आहे.त्यामुळे या पुरस्कारासाठी ते पात्र ठरले. डॉ. सोनवणे ग्रामीण भागातील लोकांच्या सेवेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेविषयी सजग आहेत. उद्योगासमोरील तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी उद्योगांना सहकार्य करण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्र अ‍केडमी ऑफ सायन्सेस (एमएएस) ही महाराष्ट्र राज्याची एक प्रमुख वैज्ञानिक अभ्यास संस्था आहे. राज्यात उद्भवलेल्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी आवश्यक ती योग्य पावले उचलावीत या उद्देशाने या संस्थेची स्थापना १९७६ साली केली होती. राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व तांत्रिक संस्थांमध्ये विज्ञान शिक्षणात सुधारणा व आधुनिकीकरणासह एमएएस महाराष्ट्र सरकारला सहकार्य करते आणि अभ्यास आणि तज्ञांच्या तपासणीचा अहवाल देते . राज्य सरकारच्या वतीने विशेष संशोधन करते. अभियांत्रिकी संशोधन क्षेत्रातील हा एक नामांकित समुदाय आहे.

१४ डिसेंबर रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार मुंबई विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू व MAS चे अध्यक्ष प्रा.गणपती यादव व C-MET चे संचालक व MAS चे सेक्रेटरी डॉ. भारत काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल नामांकित व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. पुरस्कार समितीने डॉ. श्रीराम सोनवणे यांना त्यांच्या अनुभवी अध्यापन व इंजिनीअरिंग व विज्ञान संशोधन या क्षेत्रातील बहुमूल्य कामगिरीमुळे या पुरस्कारासाठी निवडले गेले ोआहे. केमिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक असलेले डॉ सोनवणे यांना त्यांच्या कुशाग्र व्यक्तिमत्त्वामुळे त्याचा सर्वत्र आदर केला जातो.

सध्या डॉ. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली असून आणखी २ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. त्यांनी विविध नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्स आणि कॉन्फरन्समध्ये १५० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. ५ पेटंट आजपर्यंत त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे संशोधनाचे क्षेत्र बहुआयामी आहेत: उदाहरणार्थ रसायनशास्त्र, पर्यावरणीय विज्ञान, पॉलिमर, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, नॅनोटेक्नोलॉजी, नॅनोफ्लुइड्स, नॅनो पृथक्करण इत्यादी. त्यांची आयोजन क्षमताही उत्कृष्ट आहे आणि त्यांनी व्हीएनआयटीत अनेक परिषदांचे आयोजन केले आहे. त्यांनी स्वतः जगभरातील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला आणि व्याख्याने दिली आहेत. डॉ. श्रीराम सोनवणे हे एआयसीटीई, नवी दिल्लीचे तज्ज्ञ समिती सदस्यदेखील आहेत.