Published On : Sun, Dec 15th, 2019

सावरकरांबद्दल ब्रिटिशाचा विधानसभेत बोलायचे का? – फडणवीस

नागपूर – राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाविषयीचे केलेल्या विधानावरील चर्चेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांनी पटलावरून काढून टाकल्याने भाजपचा संताप अनावर झाला आहे. यावर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांच्या गौरवाची बाब महाराष्ट्राच्या नव्हे तर ब्रिटिशांच्या विधानसभेत मांडायची का, असा प्रश्न महाविकास आघाडी शासनाला विचारला आहे.

कधीकाळी सावरकरांच्या समर्थनार्थ आक्रमक भूमिका घेणारा शिवसेना पक्ष काँग्रेस-रा.काँ.शी युती झाल्यानंतर सावरकरांच्या अपमानावर शांत बसला आहे. जर सत्तेची लाचारी सावरकरांचा अपमान करणारी असेल तर ती काय कामाची? सावरकरांवर बोलण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.

आपल्यावर हक्कभंगाची कारवाई झाली तरी चालेल. मात्र, विधानसभेत सावरकरांवर बोलू दिले नाही तर ही बाब सहन करणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. प्रसंगी सभागृहाबाहेर संघर्ष करून राहुल गांधी यांना माफी मागण्यास भाग पाडू असेही ते म्हणाले.