Published On : Sat, Sep 28th, 2019

स्ट्रीट सॉकर स्कॉटलॅंडच्या चमूची नागपूर महानगरपालिकेला भेट

‘स्लम सॉकर’ नागपूर महानगरापालिकेच्या विद्यार्थ्यांना देणार फुटबॉलचे प्रशिक्षण

नागपूर : समाजातील गरीब व झोपडपट्टीमधील विद्यार्थ्यांना व खेळाडूंना खेळासोबतच अभ्यासात रूची वाढावी याकरिता ‘स्लम सॉकर’ ही संस्था नागपूर महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना फुटबॉल या खेळासोबतच गणित, इंग्रजी, विज्ञान आणि भाषेचे प्रशिक्षण देणार आहे. शुक्रवारी ‘स्लम सॉकर’ या संस्थेसोबतच स्ट्रीट सॉकर स्कॉटलॅंडच्या चमूने नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी अतिरिक्त आय़ुक्त राम जोशी यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रिडाधिकारी पियुष अंबुलकर, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, स्लम सॉकरचे अभिजीत बारसे, शिवानी चौधरी, शिवा मार्केटरस्, साजिद जलाल, स्ट्रीट सॉकरचे अंटी हूक प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सर्व मान्यवरांचा तुळशीचे रोपटे व दुपट्टा देऊन सत्कार केला. स्ट्रीट सॉकर ह्या संघटनेतील सदस्य स्कॉटलॅंडवरून नागपूरमधील विविध सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील माहिती जाणून घेण्यासाठी नागपुरात आलेले आहेत. स्कॉटलॅंडमधील स्लम वस्तीतील तसेच गरीब विद्यार्थ्यांना फुटबॉल सोबतच गणित, इंग्रजी व भाषेचे प्रशिक्षण देते. याचीच सहकारी संस्था म्हणजे नागपुरातील स्लम सॉकर. ही संस्था विविध झोपडपट्टीमधील व गरीब विद्यार्थ्यांना फुटबॉलसोबतच अभ्यासाचे धडे देणार आहे.

या योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना फुटबॉल प्रशिक्षणासोबतच गणित, विज्ञान, भाषा या सर्वांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती स्लम सॉकरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बारसे यांनी दिली. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ज्या मनपाच्या शाळांमध्ये फुटबॉल खेळू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल, त्या शाळेत हे प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात यावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिले.