Published On : Mon, Apr 16th, 2018

नगरसेवकांनी जाणून घेतले पाणी पाणीपुरवठ्याचे तंत्र

Knhan puping inspection

नागपूर: भर उन्हाळ्यात पाण्याची सर्वत्र टंचाई जाणवते. नागपूर शहराला कमी-अधिक प्रमाणात ती जाणवत असली तरी मुबलक पाणीपुरवठा करण्यात येतो. ह्या पाणी पुरवठ्याचे तंत्र काय, ते नागपूरकरांपर्यंत पोहचताना काय अडचणी येतात, पाण्याची सद्यस्थिती काय, बचतीचे महत्त्व काय, हे जाणून घेण्यासाठी उपमहापौर दीपराज पार्डीकर, जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे आणि मनपातील उपनेते बाल्या बोरकर यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नगरसेवकांनी कन्हान पंपिंग स्टेशन आणि जलशुद्धीकरण केंद्राचा दौरा केला.

सदर दौऱ्यात नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, एनईएसएलचे महाव्यवस्थापक डी.पी. चिटणीस, ओसीडब्ल्यूचे संचालक के.एम.पी. सिंग, जलशुद्धीकरण केंद्राचे प्रमुख प्रवीण सरण, ओसीडब्ल्यूचे जनसंपर्क विभाग प्रमुख सचिन द्रवेकर यांनी उपस्थित सर्व नगरसेवकांना पाणीपुरवठ्याचे आणि जलशुद्धीकरणाचे तंत्र समजावून सांगितले. नागपूर शहराला दररोज ६४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. त्यापैकी २७० एमएलडी पाण्यापासून मनपाला मोबदला मिळत नाही. १८० प्रति व्यक्ती प्रति दिवस नागपूरकरांना पाणी मिळते. जगभरातील इतर शहरांच्या तुलनेत हा आकडा उत्तम आहे. सध्या २४ बाय ७ ही प्रकल्प प्रगतीपथावर असून यासाठी ६४ कमांड एरिया निश्चित करण्यात आले आहे. यापैकी १६ कमांड एरियात २४ बाय ७ ही योजना सुरू झाली असून अन्य ठिकाणचे कार्यही प्रगतीपथावर आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत या योजनेचे ६० टक्के कार्य पूर्ण होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी यावेळी दिली. सध्या कन्हान नदी आणि पेंच जलाशयात मुबलक पाणीसाठा असून उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यामध्ये कुठलीही अडचणी येणार नाही, अशी माहितीही श्री. गायकवाड यांनी दिली.

Knhan puping inspection
याप्रसंगी बोलताना जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके म्हणाले, नागपूर महानगरपालिका नागपूर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा कशाप्रकारे करते, हे जाणून घेण्यासाठी नगरसेवकांच्या या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. असे असले तरी पाणी बचत ही काळाची गरज आहे. गरज असेल तेवढेच पाणी वापरावे, याबाबत जनजागृती करण्यासाठी नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी सर्व नगरसेवकांचे सहकार्य अपेक्षित आहे. नगरसेवकांनी याबाबत आपल्या प्रभागात जनजागृती मोहीम होती घेण्याचे आवाहन सभापती विजय झलके यांनी यावेळी केली.

Knhan puping inspection
तत्पूर्वी सर्व नगरसेवकांनी कन्हान पंपिंग स्टेशनची पाहणी करून पाणी पुरवठ्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. नगरसेवकांच्या शंकांचे निरसन मनपा आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी केले. यानंतर ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून नागपूर शहर पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील माहिती दिली. या दौऱ्यात जलप्रदाय समितीचे माजी सभापती राजेश घोडपागे, उपसभापती श्रद्धा पाठक, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, हनुमाननगर झोन सभापती रूपाली ठाकूर, नेहरूनगर झोन सभापती रीता मुळे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नगरसेवक भगवान मेंढे, राजेंद्र सोनकुसरे, किशोर जिचकार, मनोज सांगोळे, प्रदीप पोहाणे, अमर बागडे, दिनेश यादव, परसराम मानवटकर, गोपीचंद कुमरे, शेषराव गोतमारे, राजकुमार शाहू, संजय चावरे, नगरसेविका दर्शनी धवड, मंगला खेकरे, साक्षी राऊत, उज्ज्वला बनकर, भावना लोणारे, प्रणिता शहाणे, ममता सहारे, भारती बुंदे, सुमेधा देशपांडे, उज्ज्वला शर्मा, स्नेहल बिहारे, विद्या कन्हेरे, स्वाती आखतकर, वंदना भगत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर व अन्य नगरसेवक, नगरसेविका सहभागी झाले होते.