अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या चारगाव व मोहगावला पालकमंत्री यांची भेट

Advertisement

· शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी

· जिल्ह्यात सरासरी सात हजार हेक्टर शेतपिकांचे नुकसान

· नुकसानाचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा

नागपूर‍ : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील कापूस, सोयाबीन, भात आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानी संदर्भातील पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

काटोल तालुक्यातील चारगाव तसेच नरखेड तालुक्यातील मोहगाव भडाडे या गावाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन शेतातील सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यासमवेत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व कृषी विभागाचे अधिकारी, चरणसिंह ठाकुर तसेच अशोक मानकर आदी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे काटोल व नरखेड तालुक्यातील प्राथमिक अंदाजानूसार सुमारे 300 हेक्टर शेतातील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील भात, सोयाबीन, कापूस आदी विविध पिकांचे सात हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात तात्काळ पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देशही पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

मोहगाव भडाडे येथील आनंदराव मदनकर तसेच नागोराव मदनकर यांच्या शेतातील कापूस पिकांच्या नुकसानी संदर्भात माहिती त्यांनी घेतली. शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात लवकर पंचनामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी शेतकरी प्रदीप बागडे यांच्याशी संवाद साधला.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, तालुका कृषी अधिकारी श्री. कनाके, कृषी उपविभागीय अधिकारी श्री. निकम, तहसिलदार चरडे आदी उपस्थित होते.