Published On : Tue, Oct 19th, 2021

विशाल मुत्तेमवार प्रदेश काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी

नागपूर : काँग्रेसचे युवा नेते विशाल मुत्तेमवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव असून, यापूर्वी त्यांनी युवक काँग्रेसचेही महासचिवपद भूषवले आहे. याशिवाय अखिल भारतीय काँग्रेस समितीचे मीडिया पॅनलिस्ट व चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याचे प्रभारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

विशाल मुत्तेमवार हे अनेक सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय आहेत. स्वयम् सामाजिक संस्था व माय करिअर क्लबचे संस्थापक असलेल्या विशाल मुत्तेमवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक उपक्रमांसाठी चळवळ सुरू केली. नागपूरसह राज्यभरातील युवक-युवती संस्थेच्या उपक्रमाअंतर्गत रोजगार संधी, करिअर कौन्सिलिंग, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व विविध शिबिरांच्या माध्यमातून मार्गदर्शन घेत असतात.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचा प्रभारी म्हणून नियुक्त केल्याबद्दल विशाल मुत्तेमवार यांनी श्रीमती सोनियाजी गांधी, श्री. राहुलजी गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांचे आभार मानले आहेत.