Published On : Tue, Oct 19th, 2021

जहाल नक्षली मंगरु मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

शासनाने जाहीर केले होते 02 लाख रूपयांचे बक्षीस.

गडचिरोली – पोलीस उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे पेरमिली हद्दीत दि. 18-19/10/2021 रोजी मिळालेल्या गोपनिय सुत्राच्या विश्वसनिय माहितीच्या आधारे पेरमिली जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवितांना रात्रौच्या वेळी गस्त घालत असतांना जहाल नक्षली मंगरु कटकु मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाचे जवानांना यश प्राप्त झाले आहे.

Advertisement

या नक्षलीने यापुर्वी सामान्य निष्पाप नागरिकांच्या हत्या करणे तसेच पोस्टेवर हल्ले करणे यासारखे हिंसक गुन्हे केलेले आहेत.

Advertisement

नक्षल दृष्टया अतिसंवेदनशिल मौजा विसामुंडी पोमके नारगुंडा ता. भामरागड जि. गडचिरोली येथील रहीवासी असलेला मंगरु मडावी हा पेरमिली एलओएस मध्ये पेरमिली एलओएसच्या सदस्य पदावर भरती होवुन ॲक्शन टिम मेंबर म्हणुन कार्यरत होता. तसेच तो प्रतिबंधीत असलेल्या दंडकारण्य आदिवासी किसान मजदुर संघटनेचा वरिष्ठ कॅडर होता.

सन 2021 मध्ये पोमके बुर्गी हद्दीत उपसरपंच रामा तलांडी याच्या खुनात तसेच पोमके बुर्गी पोस्ट अटॅकमध्ये त्याचा समावेश होता. त्याच्यावर 03 खुन, 01 चकमक असे एकुण 04 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्याचेवर 02 लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात पार पाडण्यात आली.

मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे. – सतीश कुमार,गडचिरोली

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement