
नागपूर– नागपूर शहरात आज ‘विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा’च्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. संविधान चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या या विराट मोर्चाने शहरातील राजकीय वातावरण तापले. यावेळी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विकास ठाकरेंसह दिग्गज नेते उपस्थित होते.
मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी संविधान, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आवाज उठवत केंद्र सरकार आणि RSS यांच्या भूमिकांवर थेट प्रश्न उपस्थित केले. “देशभक्ती आणि नैतिकतेचा दावा करणाऱ्या संघाने सध्याच्या घडामोडींवर मौन का बाळगले आहे?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.
केंद्र सरकारवर जोरदार टीका-
मोर्चादरम्यान काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारवर तीव्र हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“अच्छे दिनांचे आश्वासन देणाऱ्या सरकारने जनतेची फसवणूक केली. बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक असमानता वाढत आहे. लोकशाही संस्थांवर दबाव टाकला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
RSS नेतृत्वावरही निशाणा-
या आंदोलनात RSS च्या भूमिकेवरही थेट टीका करण्यात आली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी, “आम्ही शांततेत संविधान आणि तिरंगा देण्यासाठी आलो होतो, मग नेतृत्वाने संवाद का टाळला?” असा सवाल उपस्थित केला.
‘मनुस्मृती विरुद्ध संविधान’चा मुद्दा-
मोर्चादरम्यान “मनुस्मृती विरुद्ध संविधान” हा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. सामाजिक समता, न्याय आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला.आमच्या हातात संविधान आहे आणि आम्ही त्याच मार्गाने लढणार,” असा ठाम संदेश देण्यात आला.
राजीनाम्याची मागणी, संस्थांवर दबावाचे आरोप-
मोर्चाच्या शेवटी काही वक्त्यांनी केंद्र सरकारवर पारदर्शकतेच्या अभावाचे आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था यांसारख्या संस्थांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात आला.
राज्य सरकारलाही सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात आले
.
या मोर्चामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात या मुद्द्यांवर राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









