नवी दिल्ली :भारतीय क्रिकेटचा बुलंद आवाज, संयम आणि आक्रमकतेचा समतोल राखणारा खेळाडू विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाला नवनवीन उंचीवर नेणाऱ्या आणि लाखो क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणाऱ्या कोहलीने एक युग संपुष्टात आणलं आहे.
सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत विराटने आपल्या कसोटी प्रवासाच्या शेवटाची घोषणा केली. १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने केलेली कामगिरी लक्षवेधी राहिली. ३० शतके, ३१ अर्धशतके आणि तब्बल ७ वेळा द्विशतक झळकावणाऱ्या या फलंदाजाने संघासाठी निर्णायक योगदान दिले. कोहलीने 111 कसोटी सामन्यांमध्ये 8,848 धावा केल्या असून त्याचा सरासरी 49.15 इतकी आहे.
कर्णधार म्हणूनही ठसा उमठवला-
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने ऐतिहासिक विजय मिळवले. विशेषतः ऑस्ट्रेलियात मिळालेला कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजय हा त्याच्या नेतृत्वगुणांचा पुरावा होता. आक्रमक आणि प्रेरणादायी नेतृत्वशैलीमुळे त्याला क्रिकेटप्रेमी ‘किंग कोहली’ या नावाने ओळखतात.
BCCIचा विनंतीसुद्धा व्यर्थ-
काही दिवसांपूर्वी कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) आपला निर्णय कळवला होता. त्यानंतर मंडळाने त्याला पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती केली होती. मात्र कोहलीने आपला निर्णय कायम ठेवत कसोटी क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतल्याचे स्पष्ट केले.
क्रिकेट विश्वात उद्भवलेली पोकळी-
कोहलीच्या निवृत्तीने भारतीय संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याचा अनुभव, खेळातील समज, आणि चिकाटीची जागा भरून काढणं भारतीय संघासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.