मुंबई– भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांनी खार पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
राणा यांना पाकिस्तानमधून आलेल्या कॉलमध्ये अत्यंत धोकादायक आणि अवमानकारक भाषा वापरली गेली. त्या कॉलमध्ये म्हटले गेले की, “हिंदू शेरनी तू कुछ दिन की मेहमान है, तुझे खत्म कर देंगे, ना सिंदूर बचेगा ना सिंदूर लगाने वाली बचेंगी.” राणा यांनी सांगितले की, अशाच प्रकारचे कॉल त्यांच्या पती रवी राणा यांच्या मोबाईलवरही आले आहेत.
पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, कॉल पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांना केंद्रीय यंत्रणांची मदत घ्यावी लागू शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, यापूर्वीही नवनीत राणांना पाकिस्तानातून व्हॉट्सअॅपवर धमकी मिळाली होती.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर वादग्रस्त वक्तव्य-
नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला उद्देशून केलेले जळजळीत वक्तव्य चर्चेत होते. त्यांनी म्हटले होते, “घरात घुसून मारले आहे, तुमचं कब्र आधीच तयार आहे. दिल्लीच्या गद्दीवर तुमचा बाप मोदी बसला आहे. छोटे पाकिस्तान किती दिवस सुरक्षित राहणार? एक एक करून संपवू.या तीव्र भाषणानंतरच राणा यांना परदेशातून धमकी आली असल्याचे दिसून येते. भारत आणि पाकिस्तानमधील वाढती तणावाची पार्श्वभूमी पाहता ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर-
नवनीत राणा यांच्यावर झालेल्या धमकीमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपा कार्यकर्त्यांकडून याची तीव्र दखल घेतली जात आहे आणि केंद्र सरकारकडून तत्काळ कारवाईची मागणी केली जात आहे.