नागपूर : विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबातील वाद पुन्हा एकदा पोलिस ठाण्याच्या दारात पोहोचले आहेत. अंबाझरी पोलिस ठाण्यात त्यांच्या आई डॉ. रमा फुके (वय ६८) यांनी आपल्या सून प्रिया फुके विरोधात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. रमा फुके यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं की, त्यांच्या लहान मुलाच्या पत्नीने म्हणजेच प्रिया फुके हिने नातवंडांना भेटण्यासाठी पैशांची मागणी केली तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकीही दिली.
प्रिया हिचे लग्न संकेत फुके यांच्याशी २०१२ मध्ये झाले होते. त्यांना दोन अपत्ये आहेत. मात्र, संकेत यांचे २०२२ मध्ये निधन झाल्यानंतर कुटुंबात तणाव निर्माण झाला आणि प्रिया वेगळ्या ठिकाणी राहू लागली. रमा फुके यांना नातवंडांशी संवाद साधायचा असताना प्रिया यांनी दर महिन्याला “अर्धा पेटी” रक्कम द्यावी लागेल, अशी अट घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, ६ मे रोजी संध्याकाळी प्रिया फुके यांनी कोणतीही परवानगी न घेता घरात प्रवेश केला आणि शिवीगाळ केली. पैसे न दिल्यास नातवंडांना भेटू देणार नाही, तसेच सोशल मीडियावर बदनामी करीन, अशी धमकी दिल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रिया फुके यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, प्रिया फुके यांनीही आपली बाजू मांडताना सासू रमा फुके यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ६ मे रोजी आजारी सासऱ्यांच्या बोलावण्यानुसार त्या घरात गेल्या असता त्यांच्या खोलीतील अर्धे कपडे गायब होते. तसेच दोन कर्मचाऱ्यांमार्फत त्यांचा व्हिडीओ शूट करण्यात आला. त्यानंतर घरात शिवीगाळ झाली आणि पोलिस कर्मचाऱ्याला बोलावून धमकी दिली गेली.
प्रिया फुके यांनी आपल्या तक्रारीत सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास देण्यात येतोय, असा आरोप करत, स्त्रीधन स्वतःकडे ठेवण्याचे आणि गुंड लोकांमार्फत दबाव टाकण्याचे आरोपही केले आहेत. त्यांनी पोलिस आयुक्तांकडेही लेखी निवेदन सादर केले आहे.
दरम्यान, या वादात आमदार परिणय फुके यांनी याआधी स्पष्ट केले होते की, हा वाद कौटुंबिक असून त्याच्याशी त्यांचा थेट संबंध नाही. त्यांनी तोडगा काढण्याचे प्रयत्न केले होते, पण तो निष्फळ ठरल्याचे ते म्हणाले होते.