Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Mar 24th, 2020

  सोशल मीडियावरील ‘ती’ ऑडिओ क्लिप बोगस

  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे : अफवा पासरविणाऱ्यावर होणार कडक कारवाई

  नागपूर: नागपूर शहरात कोरोनाचा ५० वर रुग्ण असल्याचा दावा करणारी मोबाईलवरील संभाषण क्लिप व्हायरल होत आहे. ही क्लिप बोगस असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन करीत अशा अफवा पासरविणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

  यासंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, नागपुरात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून परिस्थितीचे गंभीर्य आणि वेळेची गरज ओळखून तातडीने सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय तसेच नागपूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग एकत्रितपणे दिवसरात्र कार्य करीत आहे. नागपुरात होणारी चाचणी एक्सपर्ट डॉक्टर्सकडून करण्यात येते. त्यामुळे त्यावर संशय घेणे म्हणजे समर्पित आरोग्य सेवेला आणि शासनाच्या प्रामाणिक प्रयत्नांची खिल्ली उडविण्यासारखे आहे. अशा क्लिप सोशल मीडियावर फॉरवर्ड करून समाजात भीती पसरविणाऱ्या प्रवृत्तीचा प्रशासन बंदोबस्त करेलच. पण जनतेनेही अशा पोस्ट आणि क्लिप फॉरवर्ड करताना संयम बाळगावा. कुठलीही खातरजमा न करता आणि त्याची सत्यता न तपासता असे संदेह फॉरवर्ड करणाऱ्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

  केवळ ४ बाधित; प्रकृतीत सुधारणा

  नागपूर शहरात कोरोनाबाधित केवळ चार रुग्ण असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. ते आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. नागपूरकरांनी घाबरण्याची गरज नसून शासन आणि प्रशासनाच्या निर्देशाचे योग्यरीत्या पालन करावे आणि १५ एप्रिलपर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

  केवळ शासन माहितीवर विश्वास ठेवा

  कोरोनासंदर्भात अनेक चुकीच्या माहिती सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र अशा कुठल्याही माहितीवर विश्वास न ठेवता अपडेटसाठी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटर हँडलवरील माहितीला आणि शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीला खरे समजावे अथवा सत्य त्यावरून तपासावे किंवा मनपाच्या नियंत्रण कक्षातून माहिती घ्यावी, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145