Published On : Mon, Aug 24th, 2020

ग्रामोद्योगाची उलाढाल 5 लाख कोटींपर्यंत नेण्याचे लक्ष्य : नितीन गडकरी

Advertisement

खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे ‘आत्मनिर्भर गीता’चा शुभारंभ

नागपूर: देशातील ग्रामोद्योगांची उलाढाल 5 लाख कोटींपर्यंत नेण्याचे शासनाचे लक्ष्य असून एक मिशन म्हणून आम्ही हे काम करीत आहोत. तसेच पाणी, जमीन, जंगल आणि पशु यावर आधारित अर्थव्यवस्था ग्रामीण भागात निर्माण होत नाही, तोपर्यंत मागास भागाचे दरडोई उत्पन्न वाढणार नाही आणि राष्ट्राच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ होणार नाही, असे मत केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे ‘आत्मनिर्भर गीत’चा शुभारंभ ना. गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाातून झाला. याप्रसंगी आायोगाचे अध्यक्ष सक्सेना व अवधेशानंदन गिरी महाराज व ÷अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पुढे बोलताना ना. गडकरी म्हणाले- आत्मनिर्भर भारत आणि शाश्वत अर्थव्यवस्थेचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांचे आहे. त्यादृष्टीने आपण वाटचाल करीत आहोत. ग्रामीण, कृषी आणि वनवासी क्षेत्राचा विकास आणि अर्थव्यवस्था मजबूत झाल्याशिवाय दरडोई उत्पन्न वाढणार नाही. खादी ग्रामोद्योगाचा अनेक विकासाच्या योजना आहेत. या योजनांना अधिक गती द्यावी लागेल. त्यामुळे ग्रामीण भारताच्या विकासाचे चित्र बदलू शकेल, असेही ते म्हणाले.

पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या सामाजिक आर्थिक चिंतनातून पुढे आलेल्या अंत्योदयाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने आम्ही काम करीत आहोत असे सांगून ना. गडकरी म्हणाले- समाजातील शेवटच्या व्यक्तीला अन्न वस्त्र निवारा या सुविधा जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. रोज नवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. बदलत असलेले हे तंत्रज्ञान आपण स्वीकारले पाहिजे. आधुनिकीकरण आणि पाश्चातीकरणाचा उदय झाला आहे. पण आम्ही आधुनिकीकरणाची कास धरून देशाला पुढे नेत आहोत. नवीन ज्ञान विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर करून भारताचे चित्र बदलणेे शक्य आहे, असेही ते म्हणाले.

जैविक इंधन निर्मितीच्या प्रयोगातून आपण इंधनाची अर्थव्यवस्था मजबूत करून इंधन आयात कमी करू शकतो, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- 7 लाख कोटींचे इंधन आपण आयात करतो. या आयातीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावखेड्यात, वनांमध्ये उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचा उपयोग करून जैविक इंधन मिळविता येते. या इंधनावर हेलिकॉप्टर चालविण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. पण हे तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचले पाहिजे. त्याबद्दल जनजागृती झाली तर शहराकडे रोजगारासाठी येणारे तरुणांचे लोंढे थांबतील. सुखी, संपन्न आणि शक्तिशाली देश निर्माण व्हावा. आत्मनिर्भर भारताचे अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षाही ना. गडकरी यांनी व्यक्त केली.