Published On : Mon, Aug 24th, 2020

प्रशासन तत्पर; प्राण वाचविणे हीच प्राथमिकता…!

Advertisement

फेसबुक लाईव्हमध्ये मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे विधान

नागपूर: कोव्हिड-१९ ची परिस्थिती हाताळण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे तत्पर आहे. लक्षणे असतानाही चाचणी न करणे आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर उपचारासाठी धावपळ करणे, यामुळे मृत्यूची संख्या वाढली आहे. आता रुग्णांचे प्राण वाचविणे हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे लवकर चाचणी व्हावी यादृष्टीने नागरिकांना घराजवळ चाचणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णालयातील बेडची उपलब्धता जाणून घेण्यासाठी केंद्रीय कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. केवळ आणि केवळ नागरिकांच्या तत्परतेची आणि सहकार्याची गरज आहे, असे विधान नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी (ता. २३) फेसबुक लाईव्हदरम्यान केले.

Gold Rate
09 july 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver/Kg 1,08,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘कोव्हिड ब्लास्ट’ या विषयावर रविवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मागील साडे पाच महिन्यांपासून प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, आशा वर्कर्स आणि सर्व कोरोना वॉरिअर्स प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. आता सणासुदीचे दिवस आले आहे. ‘लॉकडाऊन’ हा कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी अखेरचा उपाय नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या विचारांचे लॉकडाऊन करू नये. स्वत:चे कुटुंब आणि या शहराला सुरक्षित ठेवायचे असेल तर नियम पाळायलाच हवे. प्रत्येक व्यक्ती हा कोरोनाबाधीत असू शकतो, असे समजून वागायला हवे. नियम पाळायला हवे. सण साजरे करायलाच हवे. परंपरा, संस्कृती जपायलाच हवी. मात्र, हे करताना नियम पाळायलाच हवे. केवळ प्रशासनाकडे बोट दाखवून चालणार नाही. प्रशासन त्यांचे काम करीत आहे. काळजी घेणे आपलेही कर्तव्य आहे. त्यामुळे लक्षणे असतील तर तातडीने चाचणी करा, उपचार घ्या. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले असाल तरीही चाचणी करून घ्या आणि कोरोनाचे संक्रमण थांबवा, असे आवाहन त्यांनी केले.

बेडची उपलब्धता मुबलक
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत बेडची उपलब्धता नागपूर शहरात नाही, या अफवांना भीक घालू नका, असेही ते म्हणाले. बेडच्या उपलब्धतेबाबत आपण नेहमीच खरी माहिती दिली. नागपूर शहरात सुमारे मेडिकल, मेयो, एम्स व्यतिरिक्त २४ खासगी रुग्णालयांना कोव्हिड रुग्णालयांना मानांकित करण्यात आले आहे. यातील १९ रुग्णालयांत १०० च्या वर बेड आहेत. पाच रुग्णालयांमध्ये ५० ते १०० बेड आहेत. या रुग्णालयांमध्ये एकूण २४४६ बेड आहेत. त्यापैकी ११७० बेड ऑक्सीजनची उपलब्धता असलेली आहेत तर ३६० बेड आयसीयूचे आहेत. १११ व्हेन्टिलेटर आहेत. या २४ हॉस्पीटलपैकी १५ रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले आहेत. मेडिकल, मेयो, एम्स येथेही एकूण १२०० बेडस्‌ची उपलब्धता आहे. जे कोव्हिड केअर सेंटर आहेत, तेथेही सुमारे १० हजारांवर बेडस्‌ची उपलब्धता आहे. त्यापैकी पाच हजार बेडस्‌ रेडी आहेत. केवळ ३०० बेडस्‌वर रुग्ण आहेत. त्यामुळे बेडस्‌ नसण्यासंदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

‘ई-संजीवनी ओपीडी’ ॲप डाऊनलोड करा
कोव्हिड संदर्भात माहिती हवी असेल किंवा डॉक्टरांशी सल्लामसलत करायची असेल तर केंद्र शासनाने ‘ई-संजीवनी ओपीडी’ ॲप उपलब्ध करून दिले आहे. ह्या ॲपच्या माध्यमातून आपण डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेऊ शकता. ऑनलाईन सल्लामसलत करून उपचार घेऊ शकता. या ॲपवरूनच आपल्याला करावयाच्या उपचारांची माहिती मिळेल. औषधींची नावे मिळेल. ते दाखवून मेडिकल स्टोअर्समधून औषधी घेऊ शकता. हे नागरिकांच्या सोयीसाठी असल्यामुळे प्रत्येकाने ‘ई-संजीवनी ओपीडी’ ॲप डाऊनलोड करा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी केले.

व्यापाऱ्यांना परवाना आवश्यकच
फेसबुक लाईव्हदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, नागपूर महानगरपालिकेने व्यापाऱ्यांना मनपाकडून परवाना घेणे बंधनकारक केले आहे. मनपा हे स्थानिक प्रशासन आहे. त्यामुळे शहरात किती दुकाने आहेत, ते कुठे सुरू आहेत, ज्या इमारतीत ते आहे, त्या इमारतींना परवानगी आहे का, ह्या सगळ्या बाबी जाणून घेण्यासाठी परवान्याची अट घातली आहे आणि ती कायद्याला धरून आहे. यापूर्वी ती नव्हती, यात आपला दोष नाही. इतर शहरात हा नियम आहे, मग आपल्या शहरात तो केल्यावर त्याला विरोध का, असा प्रतिप्रश्न आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला.

Advertisement
Advertisement