Published On : Wed, Jul 3rd, 2019

तिवरे धरण फुटल्याने झालेले मृत्यू सरकारच्या निष्क्रियतेचे बळी; ३०२ चा गुन्हा दाखल करा!: विजय वडेट्टीवार

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेले मृत्यू हे सरकारच्या निष्क्रियतेचे बळी असून दोषींवर ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

गांधीभवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना वडेट्टीवार म्हणाले की, हे धरण बांधून फक्त १९ वर्षे झाली. धरणाचे आयुष्यमान साधारणपणे १०० वर्ष असताना अवघ्या १९ वर्षातच धरण फुटते कसे? असा प्रश्न उपस्थित करुन या धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे. या धरणाचे काम स्थानिक आमदार सदानंद चव्हाण यांच्या खेमराज कंपनीने केले आहे. त्यामुळे दुर्घटनेला ही कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करुन या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

तिवरे धरण फुटल्याने १३ घरे वाहून गेली आहेत तर आतापर्यंत १० मृतदेह मिळाले असून अजून १८ जण बेपत्ता असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. या घटनेतील मृतकांना श्रद्धांजली अर्पण करून ते पुढे म्हणाले की, या धरणाला गळती लागली असल्याची तक्रार स्थानिक लोकांनी जलसंपदा खात्याकडे केली होती. त्यानंतर मे महिन्यात त्याची डागडुजी केली असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी केला आहे. डागडुजी करूनही धरण फुटलेच कसे, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

सरकारने राज्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे अशी मागणीही विरोधी पक्ष नेत्यांनी केली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यशवंत हाप्पे उपस्थित होते.