Published On : Mon, Jul 16th, 2018

विजय माल्ल्या भाजपाचे नवे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

मुंबई : बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून देशातून फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत प्रेरणा घेण्याचा अजब सल्ला केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांनी आदिवासी समाजातील तरुणांना दिला होता.

नुसती मेहनत करू नका, मल्ल्यासारखे स्मार्ट बना असा सल्ला ओराम यांनी दिला होता यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये जुएल ओराम यांच्यासह भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘‘मल्ल्याचा मार्ग स्वीकारा व कोट्यधीश व्हा!’’ असा नारा मोदी सरकारच्या एका मंत्र्याने दिला आहे. तर चला जनहो, मल्ल्या, चोक्सीप्रमाणे कोट्यधीश बनूया व लाल गालिचावरून परदेशात पळूया!,अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर खोचक टीका केली आहे.

आजचा सामना संपादकीय…
मोदी सरकारचा भर थापेबाजी आणि स्वस्त लोकप्रियतेवर आहे. (असा जनतेचा आरोप आहे) लोकांना ‘टोप्या’ लावण्यासाठी रोज नवीन थाप, नवा जुमला शोधण्यात त्यांचा वेळ जात आहे. ‘विकास’, ‘लोककल्याण’ यावरून लोकांचे लक्ष उडून जावे यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक जण लोकांना मूर्ख समजण्यात आणि बनवण्यात धन्य धन्य समजत आहे. ‘‘मंत्र्यांनी व भाजप पुढार्‍यांनी सटकणार्‍या जिभा आवराव्यात’’ असे फर्मान स्वतः पंतप्रधान मोदी यांनी सोडले तरी अनेकांच्या जिभांचा खमंग, लुसलुशीत ढोकळा कसा झाला याचे ताजे उदाहरण समोर आले. केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी तरुणांना एक अजब सल्ला दिला आहे.

‘‘केवळ हार्डवर्कर बनू नका. फरार उद्योगपती विजय मल्ल्यासारखं स्मार्ट बना?’’ असा मोलाचा सल्ला देऊन केंद्रीय मंत्र्यांनी भाजपचा जणू खरा चेहराच समोर आणला आहे. राहुल गांधी मुस्लिमांविषयी काय बोलतात, शशी थरूर यांची जीभ हिंदू-पाकिस्तानविषयी कशी सुसाट किंवा मोकाट सुटली आहे या संशोधनात रस घेणार्‍यांना आता भाजपचे नवे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ विजय मल्ल्या यांच्यावरही भाष्य करावे लागेल. ‘‘तुम्ही विजय मल्ल्याला शिव्या देता, पण मल्ल्या कोण आहे? तो एक स्मार्ट व्यक्ती आहे. त्याने बुद्धिमान लोकांना कामावर ठेवले. बँका, राजकारणी आणि सरकारला आपल्या कामाने प्रभावित केले.

असे करण्यापासून तुम्हाला कोण रोखतंय?’’ असा सवाल केंद्रीय मंत्र्यांनी विचारला आहे. मोदी म्हणतात, ‘‘न खाऊंगा न खाने दूंगा.’’ त्यांच्या सरकारचे मंत्री मात्र खाऊन, ढेकर देऊन पळून गेलेल्या आर्थिक दरोडेखोरांना आदर्श मानत आहेत. जगात ‘हार्डवर्क’ चालत नाही तर मल्ल्यासारखे स्मार्ट बनावे लागेल हे सरकारी धोरण असेल तर ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’सारख्या योजनांचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून मल्ल्या यांनाच नेमावे लागेल. भारतीय जनता पक्षाच्या अंतरंगावरचे झाकण उडाल्यावर काय होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. विजय मल्ल्या हे चोर नसून ते एक स्मार्ट उद्योगपती आहेत. त्यांनी बँकांना दहा-अकरा हजार कोटींचा चुना लावून पलायन केले. हे त्यांचे यश व गरूडझेप आहे. नीरव मोदी, चोक्सी वगैरे मंडळीही त्याच रांगेत आहेत.

त्यामुळे देशातील तरुणांचे आदर्श असलेल्या या उद्योगपतींवर कारवाई करणे व त्यांना लंडन-अमेरिकेतून स्वदेशी फरफटत आणणे असा विचार करणार्‍यांची डोकी तपासायला हवीत. बँका लुटून परदेशी पलायन करण्यापूर्वी विजयश्री हे यशस्वी उद्योगपती होते, पण त्यांचे यश ज्यांच्या डोळ्यांत खुपले त्यांनी षड्यंत्र करून विजयश्रींना खड्ड्यात घातले. पुण्यातील डी.एस. कुलकर्णी हे ‘बँकां’ना फसवल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. डीएसकेंना ज्या बँकांनी कर्ज दिले त्या बँकेच्या अध्यक्षांनाही अटक झाली.

अटक होण्यापूर्वी ‘डीएसके’ हे एक यशस्वी उद्योजक होते व त्यांच्या यशस्वी मार्गाचे धडे नवतरुणांना मिळावेत म्हणून सहावीच्या पुस्तकात ‘डीएसकें’वर धडा होता. आता या धड्याचे काय करायचे? असा प्रश्न महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांना पडला असेल तर त्यांनी विजय मल्ल्याप्रकरणी केंद्रीय मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचा मार्ग स्वीकारायला हवा. दाऊद हासुद्धा पाकिस्तानात पळून जाण्याआधी एक धाडसी, जिद्दी तरुण होता. त्याने अत्यंत धाडसाने आजचे स्थान मिळवले आहे असे उद्या कोणी सांगितले तरी आश्चर्य वाटायला नको.

प्रत्येकाच्या बँकेत पंधरा लाख रुपये जमा होतील व त्यासाठी परदेशी बँकांतील काळा पैसा परत आणला जाईल असे वचन सरकार पक्षाने दिले होते. ते वचन आणि स्वप्न हवेत विरून गेले. आता पंधरा लाख काय घेऊन बसलात, ‘‘मल्ल्याचा मार्ग स्वीकारा व कोट्यधीश व्हा!’’ असा नारा मोदी सरकारच्या एका मंत्र्याने दिला आहे. तर चला जनहो, मल्ल्या, चोक्सीप्रमाणे कोट्यधीश बनूया व लाल गालिचावरून परदेशात पळूया! असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे.