Published On : Mon, Jul 16th, 2018

राज्यात दूध बंद आंदोलन सुरु; ठिकठिकाणी हिंसक वळण

Advertisement

कोल्‍हापूर : दुधाला प्रति लिटर ५ रूपये भाववाढ मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी ( 15 जुलै ) रात्री १२ वाजल्‍यापासून दुधाचे आंदोलन सुरू केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवून ते रस्‍त्‍यावर ओतून दिले जात आहेत. खा. राजू शेट्टी यांनी रविवारी रात्री बारानंतर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरून दूध बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.

‘राज्यभर दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन बंद करून आंदोलन करणार आहेत. पण, न्याय्य मागणीचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी राज्य सरकार पडद्याआडून बळाचा वापर करण्याची शक्यता आहे. सर्व शक्यता लक्षात घेऊन मुंबईला दूध अडवण्यासाठी उत्पादक गनिमी काव्याने सरकारला जेरीस आणतील. हक्काचे पाच रुपये अनुदान खात्यावर देण्यास आम्ही भाग पाडू,’ असा इशारा खासदार राजू शेट्टीयांनी दिला .

खासदार शेट्टी म्हणाले, ‘दूधाचा प्रश्न गंभीर होणार आहे याकडे सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांच्याशी चर्चा केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले तर राधामोहन यांनी संकरित गाईऐवजी देशी गाई वापरून व्यवसाय करा असा सल्ला दिला. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संघांनी गाईचे दूध स्वीकारले.

पण अहमदनगरसह अन्य जिल्ह्यातील खासगी डेअऱ्यांनी १२ ते १४ रुपये दर देऊन दूध उत्पादकांची क्रूर चेष्टा केली आहे. कर्नाटक राज्याप्रमाणे दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. पण शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान न देता खासगी डेअऱ्यांना अनुदान दिले जात आहे. राज्य सरकार खासगी दूध डेअरी व संघाचे हितसंबध जोपासत आहे.’