Published On : Fri, Mar 6th, 2020

स्थायी समिती सभापतिपदी विजय झलके अविरोध

Advertisement

नागपूर– नागपूर महानगरपालिकेचे नवे स्थायी समिती सभापती म्हणून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विजय (पिंटू) झलके यांची अविरोध निवड झाली. शुक्रवारी (ता.६) मनपा मुख्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात झालेल्या निवड प्रक्रियेत पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांना निर्वाचित घोषित केले आणि तुळशीचे रोपटे देऊन त्यांचे स्वागत केले.

नागपूर महानगरपालिकेचे निगम सचिव तथा उपायुक्त राजेश मोहिते यांच्याकडे नगरसेवक विजय शंकरराव झलके यांचे तीन नामनिर्देशन पत्र दाखल झाली. पहिल्या नामनिर्देशन पत्रात प्रदीप वसंतराव पोहाणे सूचक तर राजेश घोडपागे अनुमोदक होते. दुसऱ्या नामनिर्देशन पत्रात प्रमोद कौरती सूचक तर अनिल गेंडरे अनुमोदक, तिसऱ्या नामनिर्देशन पत्रात संजय चावरे सूचक आणि वंदना भगत अनुमोदक होत्या. तीनही नामनिर्देशन पत्रांची छानणी पिठासीन अधिकाऱ्यांनी केल्यानंतर तीनही वैध असल्याचे त्यांनी जाहीर केले. यानंतर नामनिर्देशन पत्र परत घेण्याच्या अवधीत त्यांनी अर्ज परत न घेतल्याने विजय शंकरराव झलके यांची स्थायी समितीच्या सभापतिपदी अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यानंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मावळते सभापती प्रदीप पोहाणे व अन्य सदस्यांनी नवनिर्वाचित सभापती विजय (पिंटू) झलके यांचे तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले.

विजय (पिंटू) झलके यांचा अल्पपरिचय
नागपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९७८ रोजी झाला असून इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग या शाखेत अभियांत्रिकी पदविका शिक्षण पूर्ण केले आहे. व्यवसायाने कंत्राटदार आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांनी उमेदीच्या काळात भाजपच्या तत्कालिन नेत्यांसोबत अनेक आंदोलनात सहभाग घेतला. सन २००७ मध्ये त्यांनी महानगरपालिकेसाठी निवडणूक लढविली. मात्र त्यात यश आले नाही. यानंतर सन २०१७ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर त्यांनी प्रभाग क्र. २८ (ड) मधून निवडणूक लढविली. यात ते विजयी ठरले. पहिल्यांदाच निवडून आल्यानंतरही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना सन २०१८ मध्ये जलप्रदाय समितीचे सभापती बनविले.

त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे सन २०१९ मध्येही हे पद कायम ठेवले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सन २०१९ मध्ये प्रचंड पाणी टंचाई असताना पाणी कपातीचा मोठा निर्णय घेतला. या काळात ० टक्के पाणी साठा झाला होता. या परिस्थितीला ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी धैर्याने तोंड दिले. त्यांच्याच काळात कालांतराने चांगल्या पावसामुळे १०० टक्के जलसाठा झाला. त्यांच्या या पदावरील उत्कृष्ट कार्यानंतर त्यांना स्थायी समिती सभापती पद सोपवून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. शहराचा विकास हे आपले पहिले ध्येय असून त्यासाठी आपली कारकीर्द पणाला लावू, अशी प्रतिक्रिया विजय झलके यांनी पदग्रहण केल्यानंतर दिली.