Published On : Fri, Mar 6th, 2020

शहर विकासात सर्वपक्षीय नगरसेवकांचे योगदान : महापौर संदीप जोशी

Advertisement

– नवनिर्वाचित स्थायी समिती विजय झलके यांचे पदग्रहण

नागपूर– नागपूरचा विकास चौफेर आहे. यात शहरातील खासदार, आमदार, महानगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक आणि आतापर्यंत आलेल्या सर्वच अधिकाऱ्यांचे योगदान आहे. ही विकासगंगा यापुढेही सुरू राहील. स्थायी समितीचे सभापती म्हणून विजय झलके आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडतील, असा विश्वास महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती विजय (पिंटू) झलके यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती विजय झलके, सत्ता पक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, स्थायी समितीचे मावळते सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष उपनेते परिवहन समितीचे सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, संजय भेंडे, माजी महापौर नंदा जिचकार, माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया, बसपाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे, स्थायी समिती सदस्य आशा उईके, विशाखा बांते, राजेश घोडपागे, विक्रम ग्वालबंशी, प्रमिला मंथरानी, खान नसीम बानो मो. इब्राहिम, प्रमोद कौरती, वंदना भगत उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, नागरिकांना मूलभूत सोयी पुरवितानाच शहराचा विकास कसा होईल याकडे पदाधिकारी आणि प्रशासनाचा कटाक्ष असायला हवा. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही आणि विकासकामे अविरत सुरू राहतील, या दिशेने संपूर्ण पुढेही आमचे प्रयत्न सुरू राहतील. नागपूर महानगरात सर्व आलबेल सुरू असताना मुंबईचे आमदार नागपूर महानगरपालिका बरखास्त करण्यासाठी लक्षवेधी मांडतात, हे नागपूरला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. नागपूर शहरातील सर्वपक्षीय नेते हे षडयंत्र हाणून पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनीही नागपूर महानगरपालिका बरखास्तीसाठी मुंबईच्या आमदारांनी मांडलेली लक्षवेधी दुर्देवी आहे. करायचीच असेल तर पहिले मुंबई महानगरपालिका बरखास्त करा, असे प्रतिपादन केले.

नवनिर्वाचित सभापती विजय झलके यांनी आपल्या भाषणात म्हणाले, आपली कारकीर्द पूर्वीपासूनच संघर्षाची राहिली आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या कारकिर्दीत आपल्यासमोर मोठी आव्हाने आहेत. मात्र ज्येष्ठ नेते आणि सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सहकार्याने आव्हानांना सामोरे जाऊ. विकासकामे कोठेही अडणार नाही, याची काळजी घेऊ, असे प्रतिपादन केले.

सत्तापक्ष नेते संदीप जाधव, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे यांनीही यावेळी नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा देत विकासकार्यात सर्व पक्षाचे नगरसेवक आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली.

तत्पूर्वी मावळते सभापती प्रदीप पोहाणे यांनी नवनिर्वाचित सभापती विजय झलके यांना पदाचा कार्यभार सोपविला. प्रास्ताविकातून माजी सभापती प्रदीप पोहाणे यांनी आपल्या कारकिर्दीत त्यांना लाभलेल्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचा उल्लेख करीत आभार मानले आणि नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन स्थायी समितीच्या सदस्य वंदना भगत यांनी केले तर आभार उपनेत्या वर्षा ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला मनपाचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement