Published On : Tue, Dec 10th, 2019

विधीमंडळ अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात – अध्यक्ष व उपसभापती यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 16 डिसेंबरपासून सुरू होत असून, यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या विधीमंडळ सुरक्षा, निवास, वाहन, संपर्क, वाहतूक आदीविषयक व्यवस्थेचा आढावा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधानपरिषदेच्या उपसभापती श्रीमती निलम गोऱ्हे यांनी आज वरिष्ठ अधिका-यांच्या बैठकीत घेतला.

विधान मंडळाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीस विधान मंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस सहआयुकत रविंद्र कदम, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शितल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.डी.सरदेशमुख, अधीक्षक अभियंता (विद्युत) हेमंत पाटील, शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुदेश मेश्राम, मध्य रेल्वेचे प्रवर मुख्य वाणीज्य प्रबंधक कृष्णात पाटील, बीएसएनएलचे वाणिज्य अधिकारी संतोष सुरपाटणे, महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल,विधानसभेचे अवर सचिव रविंद्र जगदाळे, विधीमंडळाचे प्रमुख सुरक्षा अधिकारी महेश चिमटे यांच्या सह विविध शासकीय विभागाचे प्रतिनिधी व संबधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त करावयाच्या विविध कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष श्री.पटोले यांनी सर्व शासकीय विभागांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून सुरु असलेल्या कामांची विस्ताराने माहिती घेतली. अधिवेशनासाठी होत असलेल्या तयारीत सर्व घटक विभागांनी सुसूत्रता ठेवावी. या तयारीमुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी,विविध सुविधासाठी कार्यवाही करतांना जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, यासाठी जबाबदारीने कामे करावीत. यासोबतच विविध कामांची गुणवत्ता सांभाळावी तसेच आमदार निवासाच्या उपहारगृहातील खाद्यपदार्थाचा दर्जा राखण्याचेही निर्देश त्यांनी दिले. विधानमंडळ परिसर, आमदार निवास, रविभवन तसेच कर्मचा-यांची निवासस्थाने असलेल्या परिसरात स्वच्छतेसोबतच पाणी पुरवठ्याच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

विधीमंडळ परिसरात निर्माणाधीन असलेल्या वास्तुच्या उभारणीत विविध सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी संबंधित विभागांनी आप-आपसात समन्वय साधून विधीमंडळ सुरक्षेसाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

उपसभापती डॉ.निलम गो-हे यांनीही तयारीबाबत बारकाईने सूचना करताना अधिवेशनाच्या व्यवस्थेसाठी येणा-या महिला पोलिसांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत जाणिवपूर्वक विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. विशेषत: महिलांसाठी फिरती शौचालये,आहार विषयक सुविधांबाबत अधिक चांगली व्यवस्था करण्याचे त्यांनी सूचित केले. महिला लोकप्रतिनिधींसाठी आमदार निवासाच्या इमारतीतील पहिल्या माळ्यावर निवासव्यवस्था करण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. त्याबाबत उपसभापतींनी समाधान व्यक्त केले.

अधिवेशन कालावधीत अधिकृत सुरक्षा पासेसशिवाय परिसरात प्रवेश राहणार नाही. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आणि संबंधितांनी सुरक्षा पास जवळ बाळगावेत, असे या बैठकीत सांगण्यात आले.

विधानभवन परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण खबरदारी घेण्यात आली असून, या परिसरात 50 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर डिजीटल छायाचित्र घेणारी अत्याधुनिक यंत्रणा स्थापित करण्यात येणार असून, स्कॅनर्स मशीनसुध्दा बसविण्यात आल्याची माहिती विधीमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.

अधिवेशन काळात प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती देताना विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार म्हणाले की, अधिवेशन काळात वाहन व्यवस्थेसाठी विविध जिल्ह्यातून वाहनांचे अधिग्रहण करण्यात येते. वाहन अधिग्रहणासोबतच पर्यायी व्यवस्था म्हणून ‘ओला’ टॅक्सी ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणा सर्व प्रकारच्या कार्यवाहीसाठी अविरत प्रयत्नशील असून सर्व विभागांशी समन्वय साधून आवश्यक असणा-या उपाययोजना केल्या जात आहेत. याशिवाय गरज भासल्यास तातडीने त्यानुसार नियोजन करून कार्यवाही केली जाईल.

अधिवेशन काळात विधान भवन, विधान भवनाबाहेरील परिसर, आमदार निवास, रविभवन, 160 खोल्यांचे गाळे आदी ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत व बाह्य सुरक्षा चोख ठेवण्यात आली असून, गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्थासुध्दा करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले.

अधीक्षक अभियंता श्री.सरदेशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आवश्यक सर्व सुविधा पूर्ण करण्याच्या कामाला गती देण्यात आल्याचे यावेळी सांगिंतले. सर्व कामे पूर्ण झाली असून छोट्या स्वरूपाची उर्वरीत कामे दोन दिवसात पूर्ण होतील, असे स्पष्ट केले. दूरध्वनी, इन्ट्रानेट व इंटरनेटची सुविधा आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सुयोग येथे पत्रकारांची निवास व्यवस्था असून येथे माध्यमकेंद्र असणार आहे. रविभवन, नागभवन, रामगिरी, आदी ठिकाणी निरंतर विद्युत राहावी, यासाठी जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती विद्युत विभागाच्या वतीने देण्यात आली. रेल्वेने अधिवेशनासाठी केलेल्या व्यवस्थेची माहिती ही वाणिज्य प्रबंधक श्री.पाटील यांनी दिली.

विधान भवन, रविभवन, आमदार निवास, 160 खोल्यांचे गाळे, सुयोग पत्रकार भवन येथे वैद्यकीय रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. तसेच 211 डॉक्टर, नर्सेस यांचे वैद्यकीय पथक अधिवेशनात उपलब्ध करुन देण्यात आल्याचे वैद्यकीय उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी सांगितले.

यावेळी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला सर्व विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर श्री.पटोले व श्रीमती डॉ. गो-हे यांनी अधिका-यांसोबत विधानभवन परिसरातील कामांची पाहणी केली.