Published On : Fri, Sep 20th, 2019

विधानसभा निवडणूक : कर्मचारी प्रशिक्षणाला सुरवात

26 हजार ‍अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

नागपूर : विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते झाले.

जिल्हयातील बारा विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रकिया राबवितांना प्रत्यक्ष कामाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना विधानसभा क्षेत्रनिहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण दिनांक 26 सप्टेंबरपर्यत राहणार आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे आवश्यक असल्याची सूचना प्रशिक्षण वर्गाचे नोडल अधिकारी रविंद्र कुंभारे यांनी दिली.

विधानसभा निवडणूक कामकाजासाठी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला असून येत्या 26 सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण चालणार आहे. कविवर्य सुरेशभट सभागृह येथे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली 27 हजारांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे.

निवडणूक कामकाजासाठी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या दर दिवशी दोन बॅचेस आहेत. पहिली बॅच सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 पर्यंत तर दुसरी बॅच दुपारी 1 ते 3.30 या कालावधीत राहते. प्रत्येक बॅचमध्ये 1800 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्य सरकार, केंद्र सरकार व शासनाशी संबंधित इतर कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ड्युटी निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी लावण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्रीमती सुजाता गंधे तसेच उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे हे प्रशिक्षणाला आलेले मतदान केंद्र अधिकारी, झोनल अधिकारी, सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना मागर्दर्शन करीत आहेत.