Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Sep 20th, 2019

  आचारसंहिता काळात चोख व्यवस्था ठेवा – डॉ. संजीव कुमार

  नागपूर: आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि शांततामय वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच पोलिस यंत्रणेने आचारसंहिता काळात चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेत.

  आंतरराज्यीय समन्वय समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी नागपूर विभाग, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगाणा राज्यातील जिल्हा व पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

  लोकसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान उत्तम समन्वय साधण्यात आला होता. त्याच उत्स्फूर्तपणे राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता काळात जबाबदारी पार पाडावी. शेजारील राज्यातील जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि रेल्वे पोलिस दलाचे सहकार्य घ्यावे. त्यांच्यासोबत व्हॉटस ॲप ग्रूपसह विविध माध्यमांतून समन्वय साधावा, असेही विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले.

  निवडणूक काळात नक्षलवादी प्रभावीत क्षेत्रावर विशेष लक्ष व नियंत्रण ठेवणे, आंतरजिल्हा संभाव्य मद्यविक्री आणि रोकड वाहतुकीवर नियंत्रण मिळविणे, आणि आंतरजिल्हा सिमावर्ती भागात असलेल्या मतदान केंद्र आणि राजकीय पक्षांची कामगिरी आदींवर यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्हा, तहसील आणि मतदारसंघनिहाय निवडणूक अधिकारी यांच्यासोबत माहितीचे तात्काळ आदान-प्रदान करण्याचे योग्य नियोजन करावे. चंद्रपूर जिल्ह्यातील काही विवादित गावे आणि आंतरजिल्हा समन्वयावरही यावेळी भर देत असामाजिक तत्त्वावर आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

  निवडणूक काळात आंतरराज्यीय तपासणी नाके (चेक पेास्ट) सीसीटीव्ही, मोठ्या प्रमाणावर बॅरिकेट्स आणि संयुक्तरीत्या सशस्त्र सुरक्षा बलाच्या कमीत-कमी 10 कर्मचाऱ्यांसह अद्ययावत ठेवावेत. दरम्यान मद्य अथवा रोख वाहतुकीबाबत शेजारील राज्यांच्या रेल्वे पोलिस, पोलिस आणि जिल्हा प्रशासनासह, राज्य उत्पादन शुल्क विभागाशी जिल्हा निवडणूक प्रशासनाने समन्वय ठेवावा. या काळात रेल्वे, रस्ते आणि जल आदी विविध मार्गांनी मद्य व रोकड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य समन्वयातून संयुक्त कार्यवाही करावी. त्यासाठी धाबे, फार्महाऊस, रुग्णवाहिका, एटीएम रोकडची वाहतूक करणारी वाहने तसेच कंन्टेनर्सचीही कडक तपासणी करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिलेत.

  आंतरराज्यीय तपासणी नाक्यावर असलेल्या सशस्त्र पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे. असामाजिक तत्त्वे, तडीपार असलेले, अटक वॉरंट जारी झालेले, नक्षलवादी यांच्याबाबत तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे निर्देशही यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.

  अधिकाऱ्यांची उपस्थिती
  यावेळी नागपूर परीक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. प्रसन्न, गडचिरोली परीक्षेत्र पोलिस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंग, गोंदिया जिल्हाधिकारी श्रीमती कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक राकेश ओला, गडचिरोली पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, गोंदिया पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, चंद्रपूर पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, राजुरा सहायक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजय धिवरे, तहसीलदार प्रताप वाघमारे, छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्हाधिकारी जयप्रकाश मौर्य, पोलिस अधीक्षक श्री. कमलोचन, बिजापूर पोलिस अधीक्षक प्रकाश निकम, मध्य प्रदेशमधील छिंदवाडा पोलिस महानिरीक्षक सुशांतकुमार सक्सेना, जिल्हाधिकारी डॉ. श्रीनिवास शर्मा, पोलिस अधीक्षक मनोज कुमार राय, बालाघाट अपर जिल्हाधिकारी शिवगोविंद मरकाम, पोलिस अधीक्षक अभिषेक तिवारी, तेलंगाणातील आदिलाबाद उपविभागीय अधिकारी सुर्यनारायणा, पोलिस अधीक्षक विष्णू वॉरीयर, आसिफाबाद पोलिस अधीक्षक मल्ला रेड्डी आदी उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145