Video: नागपूर मित्र म्हणत होते ‘टेक केअर’, पण फेसबुक लाईव्हच्या नादात गेला 2 सख्ख्या भावांचा जीव
नागपूर वरून काटोलला जाणारे भरधाव झायलो वाहन हातला शिवारात उलटल्याने यात दोन सख्ख्या भावाचा जागीच मृत्यू झाला. दुसरे वाहन ओव्हरटेक करताना ही घटना हातला शिवारात घडली. तसेच मृतक चालक हा वाहन चालविण्याचे फेसबुक लाइव्ह करीत होता व त्यावर त्याच्या मित्रांच्या ‘टेक केअर’ म्हणत कॉमेंटसही पडत होत्या. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. पंकेश चंद्रकांत पाटील(27), संकेत चंद्रकांत पाटील(25, दोन्ही रा. न्यु कैलासनगर, बुद्धविहाराजवळ, नागपूर), अशी मृत भावाची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक व त्याचे मित्र पार्टी करण्यासाठी काटोल परिसरात जात होते. वाहनात मौजमस्ती सुरू असताना अचानक चालकाचे झायलो वाहन क्रमांक एमएच 31 ईके 2530 वरील नियंत्रण सुटल्याने चारदा उलटले व मार्गाशेजारील झाडावर आदळले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. एकावर काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर दुसऱ्याला नागपूर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या वाहनात एकूण नऊ तरुण होते. एकाच कुटुंबातील दोघे जण दगावल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
अंकित डोमजी राऊत (25,रा. मेडिकल चौक, नागपूर) याच्या डाव्या हाताची बोटे तुटली असून प्रणव शील (21), अंबुजा शाहू (21),मलय बिस्वास (21), अजिंक्य गुडमवार (23), राकेश डोंगरावर(24) रा. सर्व नागपूर हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय काटोल येथे उपचार सुरू आहे. घटनेचा अधिक तपास काटोल पोलीस करीत आहे.