नागपूर: गणपती विसर्जन तसेच ईद-ए-मिलादनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आमितेश कुमार यांनी आढावा बैठक घेतली.गणपती विसर्जन आणि ईद मिरवणुकीवर नागपूर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.
यंदा पाच हजारांहून अधिक पोलीस, बाराशे होमगार्ड आणि एसआरपीएफच्या दोन कंपन्यांवर कयदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच उत्सव काळात 1800 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. गणेश विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकांमुळे पोलीस दलावर अतिरिक्त ताण पडणार आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा नागरिक मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी बाहेर पडले आहेत. त्यांच्या उत्साहात कोणतीही आडकाठी आणू नये. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी घेण्यास सांगितले आहे.
महिला, बालके यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागाने घेतली असल्याचे अमितेश कुमार म्हणाले. नागपुरात शहरात २८० मशिदी आहेत. त्यामुळे कोणत्या ठिकाणी किती पोलीस बंदोबस्तासाठी ठेवायचे, त्याचे नियोजन करण्यात आले. पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफ आणि होमगार्डचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला. शहरातील गर्दीची ठिकाणे मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देऊन गुन्हेगारी तसेच उपद्रवी वृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.