नागपूर : शहरात पहिल्यांदाच ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.अवघ्या चार तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका मध्य नागपूरला बसला. पंचशील चौक परिसरात चार ते पाच फुट पाणी साचले. या परिसरात वस्त्या तसेच रूग्णालयांमध्ये पाणी शिरले आहे.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र शहरात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे करदात्यांचा पैसा जातो कुठे? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
शहरात मध्यरात्री दोन वाजेपासून पहाटे पाचपर्यंत शहरात ढगांचा गडगडाट होता. तर मोठ्या प्रमाणात वीजा कडाडत होत्या. त्यामुळे नागरिक अक्षरश: जीव मुठीत घेऊन बसले होते. या तीन ते चार तासांत कोसळलेल्या पावसामुळे नागपूरकरांची धावपळ उडाली. त्यांनतर प्रशासन जागे झाले.प्रशासनाने नागपूर पोलिस, आर्मी आणि एसडीआरएफ यांच्या सहकार्याने बचावकार्य सुरू केले.
शहरात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे प्रशासनाने मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केल्यासारखे दिसते. करदात्यांना त्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा वापर अत्यावश्यक पायाभूत सुविधांसाठी कसा केला जात आहे याची पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी करण्याचा आज प्रत्येक नागरिकाला अधिकार असल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.