नागपूर : समृद्धी महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री अचानक अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाल्याने गोंधळ उडाला. पुलावर रांगेत ठोकलेले खिळे पाहून वाहनचालकांनी दरोडेखोरांचा डाव असल्याची भीती व्यक्त केली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, तपासाअंती हे खिळे महामार्ग दुरुस्ती कामासाठी ठोकले असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. त्यात वाहनं शेजारच्या लेनमधून सावधपणे जाताना दिसतात, तर पुलावर रांगेत खिळे ठोकलेले आहेत. या ठिकाणी कोणतीही सूचना फलक किंवा अडथळे नसल्याने वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, हे काम रात्री करण्यात आले होते.
एमएसआरडीसीची सफाई-
महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाने (MSRDC) स्पष्ट केले की, हे खिळे दुरुस्तीच्या “ग्राऊटिंग” प्रक्रियेचा भाग होते. दुरुस्ती सुरु असलेल्या लेनला अडथळे लावले होते आणि उर्वरित दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या होत्या. मात्र, एका वाहनचालकाने अडथळा तोडून दुरुस्तीच्या लेनमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या वाहनाचे टायर पंक्चर झाले. त्यानंतर इतर काही वाहनांनाही त्रास सहन करावा लागला.
दरोड्याचा संबंध नाही-
प्रशासनाने स्पष्ट केले की, यामध्ये दरोडेखोरांचा काहीही संबंध नाही. अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. ही माहिती अधिकृतपणे विविध वाहनचालक गटांमध्ये पोहोचवण्यात आली आहे.
सुरक्षा उपायांची मागणी-
वाहनचालकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना महामार्गावर अशा प्रकारच्या दुरुस्ती कामात अधिक दक्षता घेण्याची मागणी केली आहे. विशेषत: समृद्धीसारख्या वेगवान महामार्गावर अचानक टायर पंक्चर होणे जीवघेणे ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. दुरुस्ती कामांच्या वेळी पक्के सुरक्षा प्रोटोकॉल आणि स्पष्ट सूचना फलक लावण्याची मागणीही वाहनचालकांनी केली आहे.