Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

  Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Aug 24th, 2019

  उद्यमशीलतेतूनच होईल विदर्भाचा विकास : ना. नितीन गडकरी

  ‘इनोव्हेशन पर्व‘अंतर्गत ‘स्टार्ट अप फेस्ट’चे शानदार उद्‌घाटन : मान्यवरांच्या मार्गदर्शनाने युवा संशोधकांना ‘स्टार्ट अप बूस्ट’

  नागपूर : ‘इनोव्हेशन’ ही आजच्या काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी सतत नवे काहीतरी शोधायला हवे. मोठं ध्येय ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. चिकाटी बाळगा. यश तुमच्या पायाशी लोळण घेईल, असा मंत्र तरुणाईला देत उद्योगी बना. उद्यमशीलतेतूनच विदर्भाचा विकास होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

  महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका, मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे आयोजित दोन दिवसीय ‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने ‘स्टार्ट अप फेस्ट’च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपडा, कर आकारणी समितीचे उपसभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अग्निशमन व विद्युत समितीचे उपसभापती निशांत गांधी, सिने कलावंत संदीप कुलकर्णी, अभिनेता भारत गणेशपुरे, गीतकार संदीप नाथ, भारत सरकारच्या एमएचआरडीचे इनोव्हेशन डायरेक्टर मोहित गंभीर, प्रमुख मार्गदर्शक चेत जैन, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, इनोव्हेशन पर्वचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉ. प्रशांत कडू, इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर, मुकुंद पाटणकर, डॉ. गादेवार, राहुल खराबे, देवेंद्र गायकवाड यांची उपस्थिती होती.

  तरुणाईला मार्गदर्शन करताना ना. नितीन गडकरी पुढे म्हणाले, आपण सतत नव्याचा शोध घेत असतो. त्यातूनच नागपुरात नव्हे संपूर्ण देशात नवे तंत्रज्ञान विकसित करू शकलो. भारतात सुमारे सात लाख कोटींचे पेट्रोल आणि डिझेल आयात केले जाते. हा खर्च कमी करण्यासाठी आता बायोफ्युएलवर चालणाऱ्या गाड्या आणण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. तणस, ऊस, नेपीयर गवत यापासून जैविक इंधन तयार करण्याचे प्रयोग सुरू आहे. इथेनॉलवर चालणारी दुचाकी टीव्हीएस कंपनीने विकसित केली. या दुचाकी प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावा असा आपला आग्रह आहे. जैविक इंधन तयार करण्यासाठी आवश्यक तणस, ऊस, नेपियर गवत शेतकऱ्यांनीच निर्माण करावे. ते संपूर्ण आपण विकत घेऊ. त्यापासून जैविक इंधन तयार करू. नवी दिल्ली, हरियाणामधील शेतकऱ्यांना आपण यासाठी प्रोत्साहित केले. २०० कोटी रुपये त्यासाठी दिले. पुढील काही वर्षात तणसापासून बनलेल्या इंधनाचे ३० ते ४० पंप नवी दिल्ली, हरियाणात असतील. यामुळे नवी दिल्लीला प्रदुषणापासून मुक्ती मिळेल. शेतकऱ्यांना काम मिळेल आणि युवांना रोजगार मिळेल. नागपूर परिसरात नेपीयर गवताची निर्मिती करून त्यापासून जैविक इंधन तयार करण्यात येईल. ५० हजार एकरमध्ये हे गवत लावण्यात येईल. या गवताला बायो डायजेस्टरमध्ये टाकून बायो डिझेल तयार करण्यात येईल. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्यांना पुढील सहा वर्षात डिझेलमुक्त करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  नागपूरची नैसर्गिक संत्रा बर्फी पोहचणार देशात
  पुढे बोलताना ते म्हणाले, नागपूर जिल्ह्यात होणाऱ्या संत्र्याच्या नावाने संत्रा बर्फी प्रसिद्ध आहे. आता ही बर्फी संत्र्याचा रस टाकून बनविण्याचा प्रयोग मदर डेअरीने केला. तो यशस्वी झाला. गणेश चतुर्थीला या संत्रा बर्फीचे लॉन्चिंग असून त्याला देशभरात मोठे मार्केट मिळणार आहे. यामुळे या भागातील संत्रा उत्पादकांचा एकही संत्रा वाया जाणार नाही. विमानात जैविक इंधनाचा वापर सुरू केला. एकंदरच काय तर कुठलीही वस्तू टाकावू नाही. त्या वस्तूंत काहीतरी शोधलं पाहिजे. आजची तरुणाईच हे करू शकते. फक्त त्यांना संधी मिळायला हवी. त्यांनी शोध लावलेल्या संकल्पनांना मांडण्यासाठी व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. हे व्यासपीठ नागपूर महानगरपालिकेने मिळवून दिले यासाठी महापौर नंदा जिचकार अभिनंदनास पात्र आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासातील हा सर्वोत्तम उपक्रम असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी यावेळी काढले.

  नवसंकल्पनांना मनपा देईल पाठबळ : महापौर नंदा जिचकार
  महापौरपदाच्या कार्यकाळात आपण ज्येष्ठ विरंगुळा केंद्र, विद्यार्थ्यांसाठी निरनिराळे कार्यक्रम, महिलांसाठी महिला उद्योजिका केंद्र आणि तरुणाईसाठी इनोव्हेशन पर्व असे उपक्रम राबविले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे असे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. युवांच्या संकल्पनांसाठी आकाश मोकळे करण्याचा मनपाचा हेतू आहे. याच व्यासपीठावर बँकांना आणून त्यांच्या माध्यमातून स्टार्ट अप साठी अर्थसहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. व्यक्तीची दिशा चुकली तर त्याला पुढचा प्रवास महागात पडतो. शासनाच्या प्रत्येक योजना दिशादर्शक आहेत. मुलांना दिशा दाखविण्याचे कार्य शासन करीत आहे. स्वत:चे मूल्य वाढवा. ज्याच्या अंगी धाडस आहे, ज्ञान आहे आणि व्यवहारचातुर्य आहे तो कधीच मागे राहू शकत नाही. सृजनशीलतेला जागं करा. नवसंकल्पनांना नागपूर महानगरपालिका पाठबळ देईल. नागपूर शहराला ग्लोबल सिटी बनविण्यासाठी आपले सहकार्य द्या, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.

  ज्या कार्याची आवड आहे ते कार्य करा : भारत गणेशपुरे
  ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता भारत गणेशपुरे यांनी आपल्या वेगळ्या शैलीतील भाषणातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करीत मोलाचा संदेश दिला. ते म्हणाले, मुंबईला विदर्भाचा लोकांचा टिकाव लागत नाही, असे म्हणणे म्हणजे आपला कमीपणा आपणच सिद्ध करणे होय. या राज्याचे मुख्यमंत्रीच विदर्भाचे आहेत. जात, उंची, वय, परिस्थिती प्रगतीच्या आड कधीच येत नाही. ज्या कामात आपली गती असेल, ज्या कार्याची आवड असेल त्या कामात लक्ष लावा. यश तुमच्यासोबत राहील. तुम्ही जो विचार मनात आणला त्या विचारांना व्यासपीठ देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आहे. लवकरच आम्ही वैदर्भी कला अकादमी स्थापन करीत आहोत. त्यातून चित्रपटासाठी आवश्यक सर्वच क्षेत्रातील व्यक्ती तयार करण्याचा प्रयत्न आहे. इथे चित्रपटांची निर्मिती सुरू झाली की रोजगार मिळतील. आपण जे निर्माण करू, त्याच्या प्रेमात पडू नका. ते विसरा आणि पुन्हा नवे काही निर्माण करण्याचा ध्यास घ्या, असा मौलिक सल्ला अभिनेते भारत गणेशपुरे यांनी दिला.

  अभिनेते संदीप कुलकर्णी यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा करून आणि दीपप्रज्वलन करून स्टार्ट अप फेस्टचे विधीवत उद्‌घाटन करण्यात आले. ‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने ‘देशी जुगाड-द इनोव्हेशन हाऊस’ हा एक टिव्ही शो भविष्यात येणार असून त्याच्या पहिल्या पत्रकाचे अनावरणही ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योग जगतातील व्यक्ती, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  स्टार्टअपसाठी अर्थसहाय्य आणि प्रसार विषयावर गटचर्चा
  उद्‌घाटन कार्यक्रमानंतर ‘स्टार्टअपसाठी अर्थसहाय्य आणि प्रसार’ या विषयावर गटचर्चा पार पडली. गटचर्चेमध्ये सुखदा चौधरी, पूनम खंडेलवाल, बी.सी. भरतिया, श्रीयस जिचकार, चंद्रहास हांडा यांनी सहभाग घेतला. गटचर्चेचे समन्वयन हरिश आदित्य यांनी केले. दुसऱ्या एका सत्रात अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी युवांना आपल्या क्षेत्रात मार्गदर्शक कसे व्हावे, याबाबत मार्गदर्शन केले.

  स्टॉल्सवरून घेतली नागरिकांनी माहिती
  ‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने लावण्यात आलेल्या स्टॉल्सवरून विद्यार्थ्यांसह नागरिकांनी आज बरीच गर्दी केली होती. शासनाच्या विविध योजनांची माहिती या स्टॉल्सच्या माध्यमातून नागरिकांनी घेतली. यासोबतच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांबाबतही नागरिकांनी जाणून घेतले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145