Published On : Sat, Aug 24th, 2019

क्षमता, कर्तृत्व व विद्वत्ता विकसित करुन नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना

नागपूर : विदर्भातील युवकांच्या क्षमता, कर्तृत्व व विद्वत्ता वृद्धिगंत करणे हे त्यांच्याच हाती असून उपलब्ध संधीचा लाभ घेऊन त्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे . त्यांनी नवकल्पनांना उद्योगात परावर्तित करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात केले .

नागपूर महानगर पालिका व मेयर इनोवेशन काऊंसीलच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक मानकापूर क्रीडा संकूल येथे आयोजित ‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने ‘स्टार्ट अप फेस्ट’ व ‘द ॲसिलरेट’चे आयोजन करण्यात आले होते . ‘स्टार्ट अप फेस्ट’ च्या उद्घाटनाप्रसंगी गडकरी मुख्य अतिथी म्हणून बोलत होते . या उद्‌घाटन सोहळ्याला महापौर श्रीमती नंदा जिचकार , उपमहापौर दीपराज पार्डीकर,आयुक्त आभिजीत बांगर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या इनोव्हेशन विभागाचे संचालक मोहित गंभीर,प्रसिद्ध मराठी अभिनेते भारत गणेशपुरे, संदीप कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.

नाविन्यपूर्ण कल्पनांनी महानगरपालिकेद्वारे बायोसीएनजी प्रकल्प साकारले जात आहेत. मुनिसीपल वेस्ट पासून बायोडायजेस्टरद्वारे तयार झालेल्या बायो सीएनजीवर 350 बस, 150 ट्रक येत्या 3 महिन्यात संचालित करण्यात येतील. यामुळे मनपाचे दरवर्षी 60 कोटी वाचतील. गडचिरोलीतील वनवासी जनतेला जैवइंधनाच्या माध्यमातून रोजगार मिळेल. नुकतेच स्पाईसजेटच्या विमानाने जैवइंधन मिश्रीत एव्हिएशन फ्युएलच्या साहायाने दिल्ली ते देहरादून असे अंतर यशस्वीरित्या पुर्ण केले, अशी माहिती ग़डकरींनी यावेळी दिली.

स्टार्ट अप. मेक इन इंडिया. स्टँड अप इंडिया , मुद्रा या शासनाच्या योजना युवकांसाठी असून त्यामूळे युवकांच्या नवसंकल्पनांना पाठबळ मिळत आहे. युवकांनी सुचविलेल्या रेन हार्वेस्टिंगच्या नवकल्पना मनपा अंमलात आणत आहे. इनोवेशन पर्वच्या माध्यमातून युवकांच्या इच्छा व आकांक्षा यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल असून त्यांना नाविन्यपूर्ण प्रयोग साकारण्यास मदत झाली आहे असे मत श्रीमती नंदा जिचकार यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले .

विदर्भात टँलेटची वाणवा नाही त्यामुळे युवकांनी स्वतःमधील सुप्त गुणांना ओळखून त्यांना चालना द्यावी असे आवाह्न ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांनी केले. याच दिवशी सायंकाळी ‘सोशल मीडिया फॅन फेस्ट’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाप्रसंगी स्टार्ट अपसंदर्भात माहिती देणारी दालनेही स्थापण्यात आली होती. कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते