
नागपूर : पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नागपूर हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २३ सप्टेंबरच्या सायंकाळपासून विदर्भात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस अनेक भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. विशेषतः २४ आणि २५ सप्टेंबरला गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या काळात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, विदर्भातील काही भागांमध्ये पावसाअभावी पिकांवर संकट निर्माण झाले असताना, पुढील तीन दिवसांचा हा पाऊस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या बदलत्या हवामानाबाबत नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनीही महत्त्वाची माहिती दिली आहे.




