नागपूर, : विदर्भातील ५५ प्रगतिशील शेतकऱ्यांचा एकदिवसीय अभ्यास दौरा अँग्रोव्हिजन फाउंडेशनच्या पुढाकारातून बारामती येथे यशस्वीरित्या पार पडला. या दौऱ्याचा प्रमुख उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे प्रत्यक्ष निरीक्षण व ज्ञान मिळवणे हा होता.
केंद्रीय मंत्री आणि अँग्रोव्हिजनचे प्रमुख मार्गदर्शक ना. श्री. नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने आयोजित या अभ्यास दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी बारामती कृषी विज्ञान केंद्रातील AI तंत्रज्ञानाने विकसित उसाच्या मॉडेल प्लॉटला भेट दिली. याठिकाणी प्रगतीशील शेतकरी सुनील भगत आणि आदित्य भगत यांच्या एकरी १४० टन उत्पन्न देणाऱ्या उसाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
भैय्यासाहेब पवार सभागृहात झालेल्या सत्रात AI संदर्भात तज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे आणि डॉ. योगेश फाटके यांनी सविस्तर प्रेझेंटेशन दिले आणि उपस्थित शेतकऱ्यांच्या शंका, प्रश्नांचे समाधान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केविकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पवार होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “कष्टाशिवाय यश नाही. जिद्द, चिकाटी नसेल तर प्रगती शक्य नाही. विदर्भामध्ये खूप मोठे पोटेन्शियल आहे. नैराश्य झटकून एकाग्रता ठेवा, कारण आपल्यासारख्या शेतकऱ्यांच्या पाठीशी नितीन गडकरींसारखे नेते ठामपणे उभे आहेत.”
अँग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष रविंद्र बोरटकर यांनी फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला, तर विश्वस्त सुधीर दिवे यांनी विदर्भातील कृषीस्थिती आणि केविकेच्या सहकार्याबाबत आपले विचार मांडले.
या दौऱ्यात मानस उद्योग समूहाचे प्रबंध संचालक डॉ. समय बनसोड, अँड. विजय जाधव, सुनील सहापुरे, नितीन कुलकर्णी, डॉ. पिनाक दंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अतिरिक्त खाजगी सचिव प्रवीण भालेराव, अमोल बिराजदार, मानस समूहाचे महाव्यवस्थापक जयंत ढगे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
विदर्भातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रत्यक्ष परिचय घडवून देणारा हा दौरा यशस्वी ठरल्याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते.