नागपूर: जुन्या कामठी पोलिसांनी नियमित गस्तदरम्यान एका संशयास्पद व्यक्तीस अटक करत मोठा गुन्हेगार जेरबंद केला आहे. एपीएमसी परिसरात अंधारात लपून बसलेल्या या व्यक्तीस विचारणा केली असता, सुरुवातीला तो चुकवाचुकवीची उत्तरे देत होता. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याची ओळख लखन ईश्वर दयाल बोरे (वय ४५, रा. लोंभी गाव, जि. भंडारा) अशी पटली.
गुन्हा करण्याच्या उद्देशाने आला नागपूरात-
प्राथमिक तपासात उघड झाले की, लखन बोरे नागपूरात कोणताही गुन्हा करण्याच्या उद्देशाने आला होता आणि आपली ओळख लपवून फिरत होता. यावरुन त्याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२ अंतर्गत जुना कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
‘कोर्ट चेकर’ अॅपमुळे लागली गुन्हेगारी इतिहासाची माहिती
पोलिसांनी ‘कोर्ट चेकर’ अॅपद्वारे त्याचा तपास घेतला असता, त्याच्यावर चोरी, घरफोडी, विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले. हे गुन्हे भंडारा, तुमसर, वारठी आणि गोबरवाही पोलीस ठाण्यांत नोंदवले गेले होते.
वारठी व गोबरवाही पोलिसांना हवा होता आरोपी-
लखन बोरे हा वारठी पोलीस ठाण्यातील विनयभंग प्रकरणात तसेच गोबरवाहीतील चोरी प्रकरणात वॉन्टेड आरोपी होता. याची खात्री झाल्यानंतर वारठी पोलिसांची एक टीम नागपूरला दाखल झाली आणि त्यांनी आरोपीची ताब्यात घेतले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई-
ही संपूर्ण कारवाई झोन ५ चे डीसीपी निकेतन कदम, एसीपी विशाल क्षीरसागर (कामठी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, पीएसआय सागर भांडारी तसेच त्यांच्या टीममधील गणेश पोराटे, श्रीकांत, रमेश बंजारा, विवेक डॉर्सेटवार व शारिक खान यांच्या सहकार्याने करण्यात आली.