Published On : Fri, Jun 18th, 2021

एजी, बीव्हीजी कंपन्याव्दारे दाखल शपथपत्राची पडताळणी करा : ठाकरे

Advertisement

नागपूर: शहर स्वच्छतेच्या कार्यामध्ये सुसूत्रता यावी व नागरिकांना सुलभता निर्माण व्हावी याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या दोन कंपन्या कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या कामाच्या संदर्भात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपले म्हणणे शपथपत्राद्वारे प्रशासनाकडे शुक्रवारी (१८ जून) रोजी सादर केले. प्रशासनाने दोन्ही कंपन्यांकडून प्राप्त शपथपत्राची झोनल अधिका-यांकडून पडताळणी करावी आणि पुढच्या सभेत अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश सत्तापक्ष नेते तथा समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिले.

एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी कंपनीच्या कामामध्ये त्रुटी आढळल्यास त्यावर होणारी कारवाई तसेच कंपनीद्वारे बेकायदेशीर काम होत असल्यास नियमाप्रमाणे कारवाई करणे याकरिता महापौर दयाशंकर तिवारी यांच्याद्वारे सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. समिती गठित करण्याचे आश्वासन महापौरांनी विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे यांच्या स्थगन प्रस्तावावर सर्व साधारण सभेमध्ये दिले होते.

या समितीद्वारे शुक्रवारी (ता.१८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये दोन्ही कंपन्यांची सुनावणी करण्यात आली. यावेळी समिती अध्यक्ष सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, सदस्य वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश महाजन, सदस्य नगरसेवक नितीन साठवणे, सदस्य अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, सदस्य उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन राजेश भगत, नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्यासह दहाही झोनचे झोनल अधिकारी आणि दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते तानाजी वनवे तर्फे दिल्या गेलेल्या व्हीडियो चित्रफीत मधे दिसणा-या वाहनांची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्राप्त करण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले. याशिवाय बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार यांच्याद्वारे दाखल व्हिडिओ ची चर्चा करण्यात आली. कंपनीकडे असलेली कर्मचारी संख्या, कचरा गाड्या, छोट्या गाड्या, जेसीबी, टिप्पर, कॉम्पॅक्टर, रिक्षा आदींची माहिती शपथपत्रामध्ये झोननिहाय सादर करण्यात आली आहे.