Published On : Fri, Jun 18th, 2021

१८ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी मनपा सज्ज,शासनाच्या निर्देशाची प्रतीक्षा

Advertisement

महापौर दयाशंकर तिवारी : केंद्रसंख्या वाढविण्यावर भर ; तयारी पूर्ण

नागपूर, : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार २१ जूनपासून संपूर्ण देशात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू करण्यात येईल. मात्र यासंदर्भात अद्याप राज्य शासनाचे कुठलेही निर्देश नाहीत. तरीही लसीकरणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका सज्ज असून जर निर्देश प्राप्त झाले तर २१ जूनपासून लसीकरण सुरू करता येईल, यादृष्टीने संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.

१८ ते ४४ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासंदर्भात एक विशेष बैठक शुक्रवारी (ता. १८) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पार पडली. बैठकीला उपमहापौर मनीषा धावडे, माजी महापौर तथा आमदार प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., आरोग्य समिती सभापती संजय महाजन, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, स्थायी समितीचे माजी सभापती विजय (पिंटू) झलके, माजी सत्तापक्ष नेता संदीप जाधव, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त राजेश भगत, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे आदी उपस्थित होते.

यासंदर्भात अधिक माहिती देताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, १८ ते ४४ वर्षादरम्यान असलेल्या नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उत्साह आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. लसीकरणासाठी सध्या १०४ केंद्र तयार असून सर्व नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा आठ ते दहा केंद्रांची वाढ करण्यात येत आहे. प्रथम नोंदणी केल्यानंतर स्लॉट आणि केंद्र ज्याप्रकारे मिळेल त्यानुसारच नागरिकांना लसीकरण केंद्रावर जायचे आहे. केंद्रांची संख्या अधिक असल्यामुळे गर्दी होणार नाही, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीनेच हे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. अशी संपूर्ण तयारी नागपूर महानगरपालिकेने करून ठेवलेली आहे. शासनाचे जसे आदेश येतील तसे लसीकरण सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. भविष्यात कोरोनावर नियंत्रण असावे यासाठी आतापासून प्रत्येक व्यक्तीची चाचणी व्हावी यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. प्रशासनाने नुकताच ‘चाचणी आपल्या दारी’ असा उपक्रम सुरू केला. कॉर्पोरेट सेक्टर, बँका, खासगी कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने ज्या ठिकाणी एकत्र २० च्या वर लोकांची चाचणी करायची आहे त्या संस्थांनी आपली मागणी मनपाकडे नोंदवावी. मनपाची चमू तेथे जाऊन चाचणी करेल. या उपक्रमाबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. या योजनेचा अधिकाधिक लाभ देण्यासाठी व्यापारी संघटनांना लेखी पत्र पाठविण्याचे निर्देश महापौरांनी दिले. याप्रमाणेच ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाचेही नियोजन करण्यात येणार आहे. फक्त कमीत कमी ५० ऐवजी ती अट २५ ची करावी, अशी सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली. मुस्लीम समाजात लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे या समाजातील धर्मगुरुंच्या माध्यमातून लसीकरणाच्या संदर्भात जनजागृती करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

महापौरांनी सांगितले की, लसीकरणाला गति देण्यासाठी एक संस्था स्लम भागात जाऊन नागरिकांना एक महिन्याचे राशन देण्यास तयार आहे. यासाठी मनपा तर्फे त्यांना लसीकरणासाठी मदत केली जाईल.

बैठकीत माहिती देताना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरणासंदर्भात अद्याप कुठलेही निर्देश नाहीत. परंतु मनपा प्रशासनाची संपूर्ण तयारी आहे. सध्या मनपाकडे ३५ ते ४० हजार डोज उपलब्ध आहेत. राज्य शासनाच्या निर्देशाशिवाय लसीकरण करणे शक्य होणार नाही. साठा उपलब्ध होताच कुठल्याही क्षणी लसीकरण सुरू करता येईल. होणारी गर्दी लक्षात घेता शंभरावर केंद्र सुरू करण्यात येत आहे. ३०० केंद्रांचे उद्दिष्ट असून लसीकरण सुरू झाल्यानंतर ते मागणीनुसार वाढविण्यात येईल तसेच यासाठी जनप्रतिनिधी यांची सुध्दा मदत घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, स्थायी समितीचे माजी सभापती विजय झलके यांनीही यावेळी सूचना मांडल्या. आमदार प्रवीण दटके यांनी लसीकरणाच्या नोंदणीसंदर्भात सूचना केली. ऑनलाईन नोंदणीत अनेक अडचणी असल्यामुळे सर्व केंद्रांवर एक दिवस अगोदर नोंदणी करण्यात यावी, जेणेकरून दुसऱ्या दिवशी नागरिकांची फरफट होणार नाही, अशी सूचना केली.