Published On : Sat, Aug 10th, 2019

वेळाहरी सालई-गोधनीत 3372 शेतकरी झाले भूमिस्वामी : पालकमंत्री बावनकुळे गोटाळपांजरी येथील जनसंवाद

वेळाहरी सालई गोधनी या परिसरातील 3372 शेतकर्‍यांच्या जमिनी भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यात आल्या आहेत. केवळ देवेंद्र फडणवीस सरकारमुळेच हे शक्य झाले. यापूर्वी याच कामासाठी 20 हजार रुपयांचा खर्च शेतकर्‍यांना करावा लागत होता. पूर्वी हे शेतकरी भूमिस्वामी नव्हते, आज ते भूमिस्वामी झाले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

वेळाहरी सालई गोधनी या परिसरात गोटाळपांजरी येथे आज आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमातून ही माहिती समोर आली. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प. सदस्य रुपराव शिंगणे, एनएमआरडीए सदस्य अजय बोढारे, रेखा मसराम, भीमराव मातीखाये, सरपंच सचिन इंगळे, पप्पू ठाकूर, सरपंच वर्षा कोडे, नरेश भोयर, नीलेश बुचुंडे, दिलीप नंदागवळी आदी उपस्थित होते.

शासनाच्या शेतकरी व सर्वसामान्य माणूस व समाजातील गरीब व्यक्तीसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- समाजातील सर्वांसाठी शासनाने काही ना काही योजना दिल्या आहेत. त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे व आपल्या समस्या सोडवणे ही आमची जबाबदारी असून त्यासाठी हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी आणलेल्या किसान सन्मान योजनेचा लाभही या शेतकर्‍यांना मिळाला असून 6419 शेतकर्‍यांच्या खात्यावर शासनाचे अनुदान पोहोचले. ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांनी शासनाला कळवावे. अन्नधान्य वाटपासाठी प्रशासन शिबिर घेत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून 533 कुटुंबे नव्याने बीपीएलमध्ये समाविष्ट करण्यात आले. 2 रुपये किलो गहू व 3 रुपये किलो तांदूळ प्रत्येक कुटुंबाला मिळतात. दिव्यांग, निराधार, दुर्धर आजाराचे रोगी यांनाही या योजनेचे लाभ पोहोचवा. कुणीही वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देही पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

बोंडअळीने नुकसन झालेल्या शेतकर्‍याां 7 कोटी रुपये वितरित करण्यात आले. 7241 शेतकर्‍यांना याचा लाभ झाला. घरकुलांचा लाभ गरीबांना होणार आहे. 2022 पर्यंत एकही बेघर या राज्यात राहणार नाही, यासाठी योजना शासनाने आणली आहे. बचतगटाच्या महिलांना अर्थसाह्य दिले जात आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्राने आयुष्यमान योजना आणली आहे. अशा सर्व योजनांचा फायदा शेतकर्‍यांनी आणि गरिबांनी घ्यावा असेही ते म्हणाले.

महावितरणतर्फ 5 कोटी रुपयांची कामे या परिसरात झाली आहे. 80 एमव्हीएचे 4 उपकेंद्र या भागात उभे झाले आहे. 18 ट्रान्सफॉर्मर देण्यात आले आहे. रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यावेळी शासनाच्या सर्व विभागाच्या अधिकार्‍यांनी आपापल्या भागातील कामांची माहिती दिली आणि किती कामे पूर्ण झाली याची माहिती उपस्थितांना दिली. मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.