Published On : Wed, Apr 11th, 2018

महाराष्ट्रतील ऊर्जा निर्मिती संदर्भातील विविध प्रश्न मार्गी लागतील : ऊर्जा मंत्री बावनकुळे


नवी दिल्ली: महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषणाच्या संदर्भातील विविध प्रश्न मार्गी लागतील, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

येथील श्रम शक्ती भवन येथे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंग यांच्या अध्यक्षतेत आज राज्यातील ऊर्जा विषयक विविध प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्याचे मंत्री श्री बावनकुळे, महाजनको चे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महापारेषण चे व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्तल महावितरण चे व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार तसेच केंद्रीय ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

यावेळी महाजनकोच्या वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये प्रदुषण कमी करण्यासदर्भांत अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी केंद्राकडून पर्यावरणाशी निगडीत योजनांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे सागुन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ शेतक-यांसाठी सुरू केलेली आहे. याअंतर्गत शेतक-यांना दिवसा सौर ऊर्जा वाजवी दरावर पुरविण्यात येणार आहे. यासाठी महाजनको 1500 मेगा वॅटचे फिडर उभारणार आहे. या प्रकल्पांच्य पायाभुत सुविधांसाठी लागणार निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. यासह जागतिक बँकेकडून घेण्यात आलेला कर्जाचा परतावा करण्याची मुदत वाढवून मिळावी अशीही मागणी करण्यात आली.

जे ऊर्जा प्रकल्प वस्तु व सेवा लागु होण्यापुर्वी सुरू झाले होते अशा प्रकल्पांना वस्तु व सेवा करांपासून वगळण्यात यावे, अशी आग्राहाची विनंती केंद्रीय उर्जा मंत्र्याकडे करण्यात आली. यावर केंद्रीय उर्जा मंत्री यांनी हा विषय वस्तु व सेवा कर परिषदेकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

महावितरण कंपनीला ‘दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना’चा व ‘एकात्मिक ऊर्जा विकास योजने’ अंतर्गत निधी मिळावा. महापारेषणची क्षमता वाढविण्यासाठी निधी मिळण्याबाबत तसेच महानिर्मिती कपंनीच्या विविध समस्यांवरही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.


राज्याच्या ऊर्जा विभागाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून याबाबत श्री बावनकुळे यांनी समाधान व्यक्त केले.