पुणे (मावळ/कामशेत): राज्यातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देईपर्यंत आणि लोकशाहीविरोधी सरकारला उलथवून टाकल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे हल्लाबोल आंदोलन थांबणार असा विश्वास विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मावळच्या जाहीर सभेत व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा दहावा दिवस असून आंदोलनातील पहिली जाहीर सभा मावळमध्ये प्रंचड उत्साहात पार पडली. प्रत्येक सभांच्याअगोदर भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येत असून या रॅलीमध्ये तरुणवर्ग मोठयाप्रमाणात सहभागी होत आहेत.
दादांनी सभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कशापध्दतीने खोटी आश्वासने देत आहेत. शेतकरीविरोधी कसे सरकार आहे हे सभेमध्ये पटवून सांगत आहेत. दादा पुढे म्हणाले की,देशाचे पंतप्रधान १० लाख रुपयांचा कोट घालतात आणि तो ४ कोटीला लिलावात विकतात.त्या कोटावर काय होतं माहित आहे का त्यावर मोदी असं लिहिलेलं होतं. जर देशाचा चौकीदार इतका महागडा कोट कसा काय घालू शकतो असा सवाल दादांनी केला.
भाजपाचे शेतकरी प्रेम हे बेगडी आहेच शिवाय यांचे नेते ढोंगी आणि फसवे आहेत. मतं मिळवण्यासाठी समाजासमाजामध्ये विष पेरण्याचे काम करत आहेत असा आरोपही दादांनी केला.
दादांनी आपल्या भाषणामध्ये पुण्याचे पालकमंत्री गिरिष बापट यांचाही समाचार घेतला.गिरीष बापट हे नासके आंबे घेतले की अडी खराब होईल असे म्हणत नासके आंबे अशी राष्ट्रवादीला उपमा देत आहेत. या गिरीष बापटांना कळतं काय बोलत आहात.अहो आमच्याकडील नासके आंबे घेवूनच तुम्ही सत्तेवर आला आहात. त्यांना परत बोलावलं तर तुमचं सरकार निघून जाईल अशा शब्दात समाचार घेतला.
येत्या आठ दिवसात पुस्तक बदला अन्यथा मुख्यमंत्र्यांना मंत्रालयाबाहेर पडू देणार नाही – खासदार सुप्रिया सुळे
दहावीच्या पुस्तकात भाजपने पक्ष आणला आहे.महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राजकाऱण करण्यात आले आहे.चुकीचा इतिहास दहावीच्या पुस्तकातून शिकवणार असाल तर ते खपवून घेणार नाही येत्या आठ दिवसात सरकारने निर्णय घेतला नाही,पुस्तक बदलले नाही तर मुख्यमंत्र्यांना मंत्रालयाबाहेर पडू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रणरागिणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मावळच्या जाहीर सभेत सरकारला दिला.
तुमच्या माझ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आज हे सरकार दहावीच्या विदयार्थ्यांसमोर चुकीचा इतिहास आणू पहात आहे. म्हणून एक आई आणि सुज्ञ पालक म्हणून मी हे आंदोलन करणार आहे असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जंयती आहे. मी पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे की,ज्या महात्मा फुलेंनी शिक्षणाची कवाडे खुली केली त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्नाने सन्मानित करावे अशी मागणी केली आहे. आणि आज त्यांच्या जयंतीदिवशीही करत आहे.
केंद्रांच्या नीतीआयोगाने नुकताच एक अहवाल जाहीर केला असून त्यामध्ये साडेतीन वर्षात महाराष्ट्र मागे आहे.नोकरी,शिक्षण,महिला सबलीकरणात मागे आणि अत्याचारात पुढे, रस्तेविकासामध्ये पिछाडीवर आहे.छोटं राज्य असलेलं छत्तीसगड राज्य महाराष्ट्रापेक्षा पुढे गेले आहे.स्त्री भ्रृणहत्येचं प्रमाण वाढलं आहे.
आज माझा महाराष्ट्र अडचणीत आहे. म्हणून परिवर्तनाची गरज आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल सुरु केले आहे.महाराष्ट्रात बदल करण्याची गरज आहे. महाराष्ट्राला राष्ट्रवादीची गरज आहे.तुम्हाला त्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे.नाहीतर पुरोगामी महाराष्ट्र फक्त कागदावरच राहिल अशी भीती खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
सुर्यावर थुंकाल तर तुमचेच तोंड पोळेल – सुनिल तटकरे
सत्ताधाऱ्यांनो सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करु नका अन्यथा त्यामध्ये तुमचे तोंड पोळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मावळच्या जाहीर सभेत सरकारला दिला.
शरद पवारसाहेबांवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना भाजप आणि त्यांच्या मंत्र्यांचा चागंलाच समाचार घेतला. फसव्या आणि खोटारडया सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने हे हल्लाबोल आंदोलन सुरु केले असून हे आंदोलन जोपर्यंत खोटारडे सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत थांबणार नाही असा निर्धार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
२०१९ मध्ये राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घडयाळच गजर करेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
राज्यात शेतकरी स्वत:चं सरण स्वत:च रचत आहेत – धनंजय मुंडे
राज्यातील शेतकरी आज स्वत:चेच सरण स्वत:च रचून पेटवून घेत आहे. तर काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या करताना कर्जमाफी न करणाऱ्या सरकारला जबाबदार धरत सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवत आहेत इतकी वाईट आणि भयावह अवस्था जनतेवर आणि शेतकऱ्यांवर आली आहे. यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं परंतु आज हे घडत आहे त्यामुळेच हे सरकार उलथवून टाकण्यासाठी सज्ज व्हा असे जबरदस्त आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मावळच्या जाहीर सभेत केले.
त्यांनी आपल्या भाषणात त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरु केलेल्या हल्लाबोल आंदोलनाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे सत्ताधाऱ्यांनी धसका घेतला आहे.हल्लाबोलचे लावलेले बॅनर भाजपाची बांडगुळं काढत आहेत.सत्ता आहे म्हणून कराल.परंतु जनतेच्या मनात घर केलेल्या राष्ट्रवादीला कसं बाहेर काढणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.
सभेत विधीमंडळ गटनेते जयंत पाटील,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,आमदार शशिकांत शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले.
या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री शशिकांत शिंदे,माजी मंत्री मदन बाफना,माजी आमदार कृष्णराव हेगडे,आमदार जयदेव गायकवाड,जिल्हापरिषद अध्यक्ष विश्वास देवकाते,विदयार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे,अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष गफार मलिक,प्रवक्ते महेश तपासे,बापूसाहेब हेगडे आदींसह मावळ,कामशेत परिसरातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.