Published On : Wed, Aug 25th, 2021

“वंदे मातरम उद्यान” शहीद सैनिकांना समर्पित करणार

Advertisement

केन्द्रीय संरक्षण मंत्री यांची महापौरांनी घेतली भेट

नागपूर : नागपूर महानगरपालिके तर्फे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी एम्प्रेस मिल परिसरातील एक लाख चौ फुट जागेवर वंदेमातरम उद्यान निर्माण करण्यात येणार आहे. हे उद्यान युध्दात शहीद झालेले सैनिक, शौर्य पदक प्राप्त सैनिक, माजी सैनिक, युध्दात वीरगति प्राप्त करणा-या सैनिकांची विधवा आणि त्यांच्या आश्रीतांना समर्पित केला जाईल.

मंगळवारी (२४ ऑगस्ट) रोजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी केन्द्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि वंदे मातरम उद्यानाची संकल्पना सांगितली. वंदे मातरम उद्यानाच्या महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. , माजी खासदार अजय संचेती उपस्थित होते.

महापौरांनी केन्द्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना दिलेल्या निवेदनात आग्रह केला की वंदे मातरम उद्यानाची निर्मिती प्रधानमंत्री श्री. नरेन्द्र मोदी यांच्या आवाहनावरुन केली जात आहे. देशाचा अमृत महोत्सवी वर्षात नवीन पीढीला सैन्य व त्यांच्याव्दारे केलेल्या बलिदानाची माहिती देण्यासाठी उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. नागपूरकरांसाठी हे उद्यान प्रेरणास्थळ ठरणार आहे. महापौरांनी केन्द्रीय मंत्री यांना विनंती केली की त्यांनी स्थल सेना, नौसेना आणि वायुसेनेतील शौर्य पदक विजेत्यांची नावे व त्यांच्या गौरव गाथेची माहिती देण्याची विनंती केली.

तसेच भारतीय सेनेचा टँक टी -७२, वायुसेनेचे दोन लडाकू विमान मिग-२३ आणि मिग – २७ सुध्दा देण्याचे निवेदन केले. उद्यानासाठी होवित्झर तोफ आणि दोन डी.पी.एस.एल.आर ७.७२ मिमी शहीद सैनिकांसाठी तयार करण्यात येणा-या स्मारकासाठी देण्याचा आग्रह केला. उद्यानात युवकांना सैन्य दलात भरती होण्यासाठी काय करावे लागेल याची सुध्दा माहिती देण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.