Published On : Wed, Aug 25th, 2021

नारायण राणे यांच्या विरुद्घची कारवाई कायदाबाह्य : ॲड. धर्मपाल मेश्राम

नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचे भारतीय जनता पक्षातर्फे कुठलेही समर्थन करण्यात येत नाही. मात्र त्यांच्यावर झालेली पोलिस कारवाई ही अत्यंत चुकीच्या पद्धतीची, नियमबाह्य व कायदाबाह्य असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली.

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांविषयी बोलल्याबद्दल या पद्धतीची पोलीस कारवाई करणे आश्चर्यकारक आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वाट्टेल ते बोलण्यात आले. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना व आता विरोधी पक्षनेते असताना सुद्धा त्यांच्याबद्दलही काहीबाही बोलण्यात आले. यावर कुठलीही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार अशा पद्धतीची कारवाई करणार असेल तर ती अत्यंत चुकीची व असहनीय आहे. याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेद्वारे नेहमीच आपल्या संस्कृतीचे दाखले देण्यात येतात. मात्र आज त्याच महाराष्ट्रात एका मंत्र्याला जेवणाच्या ताटावरून उठविण्यात आले. भरल्या ताटावरून उठविणे हे आपल्या संस्कृतीत नक्कीच नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे जेवण संपेपर्यंत पोलीस वाट पाहू शकत नव्हते का? असा सवालही त्यांनी केला. संस्कृतीचे दाखले देणा-या शिवसेनेसारख्या पक्षाच्या नेतृत्वातील सरकार, पोलिस प्रशासनाने अशा पद्धतीची कृती करणे हे गैरकायदेशीर, कायदाबाह्य असल्याचे सांगत संपूर्ण कृतीचा त्यांनी निषेध नोंदविला.

असेच सुडाचे राजकारण शिवसेना करीत असेल तर हे अत्यंत चुकीचे असून महाराष्ट्राच्या महान परंपरेला हे निश्चितच शोभणारे नाही. महाराष्ट्रात सरकारात असताना तत्कालीन मंत्री छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यासाठी आदेश दिले होते. त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे आज बसतात. आताची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध कटकारस्थान करणा-या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत असतील तर त्यांचे राजकारण कोणत्या दिशेने चालले यांचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे, असा टोलाही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी लगावला.