Published On : Wed, Aug 25th, 2021

नागरिकांनी पाळावा ‘शनिवार माझा कोरडा दिवस’

Advertisement

महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर : डेंग्युचा प्रादुर्भाव वाढू नये, या दृष्टीने चंद्रपूर शहरात प्रत्येक ‘शनिवार माझा कोरडा दिवस’ ही मोहीम चंद्रपूर मनपा प्रशासनामार्फत नागरीकांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. २४) मनपाच्या सभागृहात झालेल्या डेंग्यू उपाययोजना आढावा बैठकीत महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी सदर मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.

बैठकीला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) अमोल शेळके, सर्व वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने डेंग्यु व इतर कीटकजन्य आजार पसरण्याची भीती असते. डेंग्युचा मच्छर हा साचलेल्या पाण्यात आढळतो. त्यामुळे आपल्या घरात आणि आजूबाजूला पाणी साचू नये, यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘शनिवार माझा कोरडा दिवस’ ही आपल्या सर्वांची मोहीम असणार आहे. घर व परीसरातील पाणी साठ्यात डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतल्यास आपण व आपल्या कुटुंबियांना याचा निश्चितच फायदा होईल. मोहीमेस सहकार्य करून डेंग्युला हद्दपार करण्यास नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे.

डेंग्युला आळा घालणे आवश्यक असल्याने मनपा प्रशासनामार्फत ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. यापूर्वी मनपा प्रशासनामार्फत वेळोवेळी डेंग्युसंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचना व जनजागृती करण्यात आली आहे. मात्र, आता आशा वर्करमार्फत गृहभेटीदरम्यान घरच्या साचलेल्या पाण्यात लार्वा आढळल्यास नोटीस बजावून १००० रुपये दंड करण्यात येणार आहे. शनिवारी कोरडा पाळताना आशा वर्करमार्फत घरोघरी सर्वे करण्यात येईल. याशिवाय मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारीसुद्धा प्रत्येकी १० घरी आकस्मिक भेटी देतील. याव्यतिरिक्त शहरातील मोकळे प्लॉट्सवर साफसफाई नसल्यास आणि कचरा आढळल्यास प्लॉट्धारकास दंड आकारण्यात येणार आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे पावसाळा लागताच डास प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत किटकनाशक फवारणी (स्प्रेईंग) करण्याची व डास अळी असलेले दूषित भांडी आढळल्यास अबेट, टेमिफॉस औषधी टाकण्यात येत आहे. , नाल्यांतील, खाच-खड्यात साचलेल्या पाण्यात जळलेले ऑइल टाकण्याची कार्यवाही सुरु आहे. शहरात धुरीकरण व औषध फवारणी, गृहभेटी, सर्वेक्षण सातत्याने करण्यात येत आहे.

डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यू ताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे , अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु या रोगाबाबत अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका द्वारा याबाबत नागरिकांना वारंवार माहिती देऊन आरोग्य व स्वच्छता विभागाद्वारे युद्धपातळीवर कार्य करून जनजागृती करण्यात येत आहे.

रक्त तपासणी शिबीर होणार
शहरातील ज्या भागात डेंग्यू रुग्ण आढळत आहेत, अशा ठिकाणी रक्त तपासणी शिबीर घेण्यात आहे. या माध्यमातून ज्यांच्या रक्तात लक्षणे दिसून आल्यास वेळीच खबरदारी घेता येईल. याशिवाय रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी रक्तदान शिबीर घेण्यात येणार असून, मनपा कर्मचारीही स्वेच्छा रक्तदान करणार आहेत.