Published On : Mon, Aug 14th, 2017

‘वंदेमातरम्‌’मुळे विद्यार्थ्यांवर देशभक्तीचे संस्कार : महापौर नंदा जिचकार


नागपूर:
नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘वंदेमारतम्‌’ महापौर चषक स्पर्धेचा समारोप थाटात झाला. विविध गटात झालेल्या या स्पर्धेत विविध गटात स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले-आऊट, साऊथ प्वॉईंट स्कूल ओंकारनगर आणि मुंडले इंग्लीश स्कूल हे महापौर चषकाचे मानकरी ठरले. राष्ट्राभिमान वाढविणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गायिलेल्या वंदेमारतम्‌ आणि देशभक्तीपर गीतांना नागपूरकरांना स्फुरण चढविले.

विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक सभागृहात विद्यार्थ्यांच्या जल्लोषाच्या वातावरणात पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. मंचावर स्थायी समिती सभापती संदीप जाधव, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, विधी विशेष समिती सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, हनुमान नगर झोन सभापती भगवान मेंढे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका पल्लवी शामकुळे, सोनाली कडू, आरती वाघमारे, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सर्वश्री सुनील हिरणवार, पिंटू झलके, राजेंद्र सोनकुसरे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार उपस्थित होते.


यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, ‘वंदेमातरम’ ही स्पर्धा विद्यार्थ्यांवर देशप्रेमाचे संस्कार रुजविणारी स्पर्धा आहे. पूर्वीच्या लोकांनी देशासाठी बलिदान केले. आता देशाप्रती प्रेम व्यक्त करायचे असेल तर माझा देश, माझे शहर ही भावना ठेवून आपले शहर, आपला देश स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करायला हवा. आपले हे कर्तव्य बजावायला हवे. ‘वंदेमातरम’ महापौर चषक स्पर्धा ही आता नागपूरची ओळख बनली आहे. याचा अभिमान बाळगायला हवा, असेही त्या म्हणाल्या.

ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी आपल्या भाषणातून ‘वंदेमातरम्‌’चा इतिहास सांगितला. ‘वंदेमारतम्‌’ पूर्ण म्हणणारी नागपूर महानगरपालिका देशात एकमेव असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, वंदेमातरम या राष्ट्रगानात भारतमातेची तुलना लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वती या देवींशी केली आहे. ज्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रगानाचा सन्मान होतो, तो देश प्रगती करतो, असेही ते म्हणाले.

सर्व विजेत्या संघांना महापौर नंदा जिचकार आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते रोख पुरस्कार, करंडक, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. याच वेळी रामायण स्पर्धेत देशपातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या वाल्मिकीनगर महानगरपालिका शाळेचा विद्यार्थी अरबाज कुरेशी यालाही महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविक शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी केले. संचालन क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी केले. बक्षीस वितरण समारंभाचे संचालन श्रीमती गावंडे यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी मानले. परीक्षक म्हणून आकांक्षा नगरकर-देशमुख, मनोहर ढोबळे, स्नेहल पाठक यांनी काम पाहिले. परिक्षकांचाही महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.वंदेमातरम्‌ स्पर्धा तीन गटात आयोजित करण्यात आली होती. ९ ते ११ ऑगस्टदरम्यान विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात चाललेल्या ‘वंदेमातरम्‌’ प्राथमिक फेरीत ११० शाळांच्या संघांनी भाग घेतला होता.यात मनपाच्या २८ शाळांचा समावेश होता. यातून १२ संघांची निवड करण्यात आली होती. सदर १२ संघांमध्ये विविध गटात आज (ता. १४) अंतिम सामना रंगला. स्पर्धेला विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

विजयी संघ
गट क्र. एक (वर्ग ९ ते १०) : प्रथम : मुंडले इंग्लीश स्कूल, नागपूर. द्वितीय : मॉडर्न स्कूल, कोराडी रोड, तृतीय : बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन, प्रोत्साहन : भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर.

गट क्र. दोन (वर्ग ६ ते ८) : प्रथम : साऊथ प्वॉईंट स्कूल, ओंकारनगर, द्वितीय : भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिर, त्रिमूर्तीनगर, तृतीय : विवेकानंद नगर हिंदी उच्च प्राथमिक शाळा, प्रोत्साहन : स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे ले-आऊट.

गट क्र. तीन (वर्ग १ ते ५) : प्रथम : स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे ले-आऊट, द्वितीय : भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिर सिव्हील लाईन्स, तृतीय : साऊथ प्वॉईंट स्कूल, हनुमाननगर, प्रोत्साहन : दुर्गानगर मराठी उच्च प्राथमिक शाळा, विशेष प्रोत्साहन : द ब्लाईंड बॉईज असोशिएशन.