Published On : Thu, Aug 10th, 2017

‘वंदेमातरम्‌’मुळे बालमनावर देशभक्तीचे संस्कार : महापौर नंदा जिचकार

नागपूर: ‘वंदेमातरम्‌’ ही समूहगान स्पर्धा असली तरी अशा स्पर्धेतून विद्यार्थीमनावर देशभक्तीचे संस्कार रुजत असतात, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘महापौर चषकां’तर्गत आयोजित ‘वंदेमातरम्‌’ समूहगान स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा सभापती नागेश सहारे, धरमपेठ झोन सभापती रुपा राय, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, उपायुक्त रवींद्र देवतळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, परीक्षक सुधीर वारकर, मोहन भोयर, ज्ञानेश्वर खडसे उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, माजी महापौर कुंदाताई विजयकर यांनी सुरू केलेल्या ह्या स्पर्धेने अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात लोकप्रियता मिळविली. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये स्वत:चे अस्तित्व असते. त्याला संस्काराची जोड दिली तर भविष्यातील देशभक्त नागरिक घडत असतो. डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी हे संस्कारामुळेच महामानव झालेत. ‘वंदेमातरम्‌’ ही स्पर्धा संस्कार घडविण्याचा उत्तम मार्ग आहे. अशा स्पर्धेमुळे देशभक्ती, देशप्रेम उत्तरोत्तर वाढत असते.


शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, ‘वंदेमातरम्‌’ ही स्पर्धा प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती सन्मान आणि अभिमान जागवते. ह्या स्पर्धेत भविष्यात नागपुरातील प्रत्येक शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करीत सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी ‘वंदेमातरम्‌’ स्पर्धेमागील पार्श्वभूमी विषद केली. तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार आणि अन्य मान्यवरांनी देवी सरस्वती आणि बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी स्पर्धेच्या परिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.

९ ते १४ ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेतील प्राथमिक फेरीतून दररोज तीन संघांची निवड करण्यात येईल. अंतिम फेरी १४ ऑगस्ट रोजी असून प्राथमिक फेरीतील विजेत्या संघांमधून अंतिम तीन संघांची निवड करण्यात येईल.

कार्यक्रमाचे संचालन मनपाचे क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला विविध शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.