नवी दिल्ली : राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या सन्मान आणि प्रतिष्ठेला आता कायद्याचे अधिक मजबूत संरक्षण मिळणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा) विधेयक, २०२६’ला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ‘वंदे मातरम्’च्या अवमानाविरोधात कठोर कारवाई करता येणार आहे.
संसदेने नुकतेच १९७१च्या संबंधित कायद्यात बदल करणारे विधेयक मंजूर केले होते. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या सुधारणेची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नव्या कायद्यानुसार ‘वंदे मातरम्’चे गायन जाणीवपूर्वक थांबवणे किंवा सुरू असलेल्या गायनात अडथळा आणणे हा गुन्हा ठरणार आहे. अशा प्रकरणात दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्याच प्रकारचा गुन्हा पुन्हा केल्यास किमान एक वर्षाच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ला पहिले स्थान-
नव्या नियमावलीनुसार एखाद्या शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन-गण-मन’ दोन्ही सादर करण्यात येणार असतील, तर प्रथम ‘वंदे मातरम्’ गायले जाणार आहे. राष्ट्रीय गीत सुरू असताना उपस्थितांनी सावधान स्थितीत उभे राहून त्याचा सन्मान करणे अपेक्षित आहे.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरून प्रथमच ‘वंदे मातरम्’चे गायन करण्याची तयारी करण्यात आली आहे. अधिकृत कार्यक्रमांसाठी गीताची सहाही कडवी सादर केली जाणार असून, त्यासाठी तीन मिनिटे दहा सेकंदांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
शाळांमध्येही समूहगायन-
देशातील शाळांमध्ये दैनंदिन कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम्’च्या समूहगायनाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वातंत्र्यलढ्यात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या गीताला महत्त्वपूर्ण स्थान राहिले आहे.
दरम्यान, २४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ‘वंदे मातरम्’ला विशेष सन्मान देण्याची भूमिका मांडली होती. आता कायद्यातील नव्या सुधारणेमुळे राष्ट्रीय गीताच्या सन्मानाला औपचारिक कायदेशीर आधार मिळाला आहे.





