Published On : Tue, Aug 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पाचपावलीतील गुन्हेगारी टोळीवर मोक्काची कारवाई; सहा जणांवर गुन्हा दाखल, दोघे फरार

Advertisement

नागपूर : शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू ठेवली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत टोळीप्रमुखासह एकूण सात आरोपींचा समावेश असून, त्यापैकी दोन आरोपी फरार आहेत.

पाचपावली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ४७६/२०२६ मध्ये आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात आली. आरोपी सातत्याने संघटित पद्धतीने गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ मधील कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) लागू करण्यात आले.

या प्रकरणातील टोळीप्रमुख जगदिश विजय गोखले (वय २७) हा सध्या फरार आहे. त्याच्यासह अंकीत उर्फ बिट्टू सूर्यकांत चावरे (२७), नचिकेत उर्फ छोटू केशव झाडे (१९), मयुर उर्फ दात-या किशोर आदित्य (२२), राकेश नारायण भुरे (१९), राहुल रामअवतार शिरसाट (२३) आणि चंद्रशेखर उर्फ चंदू सदाशिव पौनीकर (२०) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यातील राहुल शिरसाट हाही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान ही टोळी वाहन चोरी, रात्रीच्या घरफोड्या तसेच इतर गंभीर गुन्ह्यांमधून आर्थिक फायदा मिळवत असल्याचे समोर आले. आरोपींविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दरोडा, शस्त्र कायद्याचे उल्लंघन, दुखापत, वाहन चोरी आणि रात्रीच्या घरफोडीचे विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २३ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

Advertisement

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी, संघटित पद्धतीने सुरू असलेली गुन्हेगारी आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेऊन मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारीविरोधात नागपूर शहर पोलिसांची शून्य सहनशीलतेची भूमिका कायम राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे आणि अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक) विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिमंडळ क्रमांक ३ चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी नागरिकांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या हालचालींबाबत माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.