Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jul 16th, 2020

  वनअमृत’ची उत्पादने होणार लवकरच विक्रीसाठी उपलब्ध – संजय राठोड

  नागपूर : वन विभाग व स्थानिक यांचा संयुक्त वनउपज प्रक्रिया प्रकल्पातील ‘वनअमृत’ची उत्पादने शहरातील प्रमुख ठिकाणी विमानतळ, रेल्वे स्टेशन तसेच बसस्थानकावर विक्रीसाठी उपलब्ध करण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. तसेच उत्पादित माल विकण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, म्हणून बचत गटांसाठी मॉलची निर्मिती करण्यात येईल, असे प्रतिपादन वन मंत्री संजय राठोड यांनी आज येथे केले.

  सेमिनरी हिल्स येथील संयुक्त वनउपज प्रक्रिया प्रकल्प येथे महिला बचत गटांमार्फत चालविण्यात येणाऱ्या ‘वनअमृत केंद्रा’चे उद्घाटन श्री. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार आशिष जयस्वाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्रीराम बाबू, एन. के. राव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक टी. के. चौबे, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार, उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ला, भारतीय वन सेवा परिविक्षाधीन अधिकारी अदिती भारद्वाज, रेस्क्यू सेंटरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गंगाधर जाधव, सहायक वनसंरक्षक संदीप गिरी यावेळी उपस्थित होते.

  ‘वनअमृत’ला योग्य बाजारपेठ मिळावी आणि हा ब्रॅन्ड राज्यात प्रसिद्ध व्हावा यासाठी बिग बजार, रिलायन्स अशा मोठ्या मॉल्स असलेल्या कंपन्यांसोबत करार करून तेथे ‘वनअमृत’च्या उत्पादनाला विक्रीसाठी स्टॉल्स लावण्याची परवानगी देण्यासंदर्भात लवकरच कार्यवाही करण्यात येईल. ‘वनअमृत’द्वारे उत्पादित करण्यात येणाऱ्या उत्पादनाव्यतिरिक्त आणखी जीवनावश्यक वस्तू व खाद्य पदार्थांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येईल. यासाठी बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल. आगामी काळात बांबूची उत्पादने, साबण, वॉशिंग पावडर, लिक्विड साबण, सुगंधित पदार्थ, संत्रा उत्पादने यासारख्या विविध उत्पादने निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात येईल. या प्रकल्पामुळे बचत गटातील महिलांना तसेच गावातील लोकांना गावातच रोजगार मिळेल. शिवाय हा प्रकल्प मानव आणि वने यांना जवळ करणारा प्रकल्प असल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले. बचत गटांच्या महिलांशी श्री. राठोड यांनी यावेळी चर्चा केली. त्यांच्या समस्या समजावून घेतल्या.

  नागपूर वन विभाग, संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि महिला बचत गट यांच्या माध्यमातून वनक्षेत्र व खेड्यांमधील वनउत्पादन व विपणन प्रक्रिया राबवून हा उपजीविका प्रकल्प चालविला जातो. या माध्यमातून जैव विविधता संवर्धन साधण्यात येत आहे. ‘वनअमृत’अंतर्गत 20 महिला बचत गट कार्यरत असून त्यात 232 महिलांना रोजगार प्राप्त होत आहे. वन उत्पादने संकलित करुन तयार करणे आणि पॅकेजिंग करणे हे काम महिला बचत गटाद्वारे करण्यात येते. या प्रकल्पामध्ये आवळा कॅन्डी, मुरब्बा, लोणचे, बेल ज्यूस, मुराब्बा, चिंच सॉस, मोहा जॅम, ज्यूस, करवंद व फणसाचे लोणचे, जॅम तसेच सेंद्रिय अन्न उत्पादने, गांडूळ खत यांची निर्मिती करण्यात येते. वन उत्पादनाची उपलब्धता हंगामी असल्याने वर्षभर रोजगार उपलब्ध करण्यासाठी इतर उत्पादने उदा. कापडी तसेच कागदी पिशव्यांची निर्मिती करण्यात येते, अशी माहिती श्री. शुक्ला यांनी दिली.

  ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला भेट
  वनउपज प्रक्रिया प्रकल्प केंद्राजवळील वन्यजीवांच्या रक्षणासाठी चालविण्यात येणाऱ्या ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ला श्री. राठोड यांनी भेट दिली. ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये कंट्रोल रुम, रेस्क्यू युनिट आणि श्वान पथक अशा तीन युनिटचा समावेश आहे. येथे अपघातग्रस्त वन्य प्राण्यांचा बचाव, प्राणी-पक्षी यांच्यावर उपचार, अनाथ वन्य प्राण्यांचा सांभाळ करण्यात येतो. प्राण्यांच्या उपचारासाठी रेडिओग्राफी, ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन पुरविणारे यंत्र सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. प्राणी, पक्षी यांच्यावर उपचार कडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येते. प्राण्यांसाठी उपलब्ध संसाधनांची पाहणी करून याबाबत श्री. राठोड यांनी समाधान व्यक्त केले. वन्यजीव बचाव केंद्रासाठी ज्या नागरिकांनी सामाजिक भान जपून मदत केली आहे, त्यांचा यावेळी श्री. राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  जारुळ वनवाटिकेचे उद्घाटन
  सेमिनरी हिल्स वनपरीक्षेत्रातील व्हीआयपी गेस्ट हाऊसच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘जारुळ वनवाटिके’चे उद्घाटन श्री. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. हिवाळी अधिवेशन कालावधीत तसेच मंत्रालयीन कामकाजासाठी येणारे, वनविभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या राहण्याच्या सुविधेसाठी ही इमारत बांधण्यात आली आहे. मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद बिलाल अली, डॉ. मयूर काटे, पर्यवेक्षक समीर नेवारे, सिद्धांत मोरे आदी यावेळी उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145