Published On : Thu, Jul 16th, 2020

पोहरादेवी लिंक रस्त्याचे काम जलदगतीने करावे : राठोड

Advertisement

नागपूर, : पोहरादेवी हे बंजारा समाजातील भाविकांचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. पोहरादेवी येथे होणारी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पांचाळा ते पोहरादेवी या तीन किलोमीटरच्या रस्त्यांचे काम जलदगतीने करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी आज हरीसिंग सभागृहात आयोजित बैठकीत दिले.

आर्णी-मानोरा-अकोला या राष्ट्रीय महामार्गावरील 161-अ या महामार्गाच्या दर्जोन्न्तीच्या कामासाठी वनक्षेत्रातून जाणाऱ्या पोहरादेवी लिंक रस्त्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

पोहरादेवी संस्थानात वर्षभर भाविकांचा ओघ सुरू असतो. तेव्हा भाविकांना पोहरादेवी यात्रा व अन्य उत्सवादरम्यान जाणे सुलभ व्हावे, यादृष्टीने या टप्प्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वनविभागाकडे पाठवण्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) तथा महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू, संजीव गौड यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोहरादेवी विकास संदर्भातील कामासंदर्भातही श्री. राठोड यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रस्तावित कामांच्या बांधकामाचा आढावा घेतला. त्यामध्ये येथील प्रस्तावित संग्रहालयाचे काम हे उच्च दर्जाचे व गुणवत्तापूर्ण करावे. तसेच संग्रहालयात बंजारा समाजाचे सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक, लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारी चित्रे, दृकश्राव्य संगीताचा समावेश करण्याची सूचना श्री. राठोड यांनी केली. सुभाष जाधव, गणपत राठोड, वास्तुविशारद हबीब खान, अमरदीप बहल, अधीक्षक अभियंता श्री. जोशी यासह अन्य लोक यावेळी उपस्थित होते.