नागपूर: ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत खेडी गोवार गोंडी, धुरखेडा, रामपुरी व सिहोरा या गावांची राज्यस्तरावर अतिविशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 0 ते 2 वर्ष वयोगटातील सर्व बालके तसेच गरोदर मातांची तपासणी करुन लसिकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या हस्ते सिहोरा येथे झाले.
ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत विशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेसाठी राज्यातील 23 जिल्हयांची निवड झाली असून यामध्ये नागपूर जिल्हयातील चार गावांचा समावेश आहे. या मोहिमेमध्ये बालकामधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसिकरण हे प्रभावी साधन असल्यामुळे अर्धवट लसिकरण झालेली बालके व लसिकरण न झालेली बालके इतरांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा त्यांचा मृत्यू होत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आल्यामुळे ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
इंद्रधनुष मोहिमेअंतर्गत 0 ते 2 वर्ष वयोगटातील 69 लाभार्थी व 5 गरोदर माता यांचा समावेश होता. 33 लाभार्थी व 4 गरोदर मातांचे लसिकरण करण्यात आले. यावेळी क्षेत्र नगरसेविका, अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. शशिकांत जाधव, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई, तसेच आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
