Published On : Wed, Apr 25th, 2018

मागासवर्गीय उमेदवारांच्या रिक्त पदांची माहिती संकलीत करावी – मुख्य सचिव

नागपूर: शासकीय विभागातील मागासवर्गीय उमेदवारांच्या खातेनिहाय रिक्त पदांची माहिती संकलीत करून मागासवर्ग कक्षाने सादर करावी, असे निर्देश मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिलेत.

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी मुख्य सचिवांसमोर विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.यावेळी कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत मागासवर्गीय उमेदवारांचा खातेनिहाय रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये नगर विकास, महसूल, शालेय शिक्षण, ग्रामविकास, सामाजिक न्याय, सहकार व पणन या विभागातील मागासवर्गीय उमेदवारांच्या अनुशेषाविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

मागासवर्गीय उमेदवारांच्या अनुशेषाबाबतच्या माहितीचे विस्तृत संकलन विभागांनी करावे. आरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार विभागांनी काम करावे, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.

यावेळी मुख्य सचिवांचा कास्ट्राईब संघटनेच्यावतीने शाल व भगवान बुध्दाची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.